ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा देऊळगाव राजात निषेध : डॉक्टर संघटनांचा सरकारला इशारा 

  'डॉक्टरांवरील हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही'; देऊळगाव राजात तीन वैद्यकीय संघटनांचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डोंबिवली येथील महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ देऊळगाव राजा येथील विविध डॉक्टर संघटनांनी सोमवारी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच राज्यातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली.

डॉक्टर्स असोसिएशन, निमा (NIMA) डॉक्टर्स असोसिएशन आणि आयएमए (IMA) डॉक्टर्स असोसिएशन, देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह राज्य शासनाला पाठविण्यात आले. तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्यात आल्या.

निवेदनात डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला असून, या प्रकरणातील दोषींवर कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय निष्पक्ष आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. आरोग्य संस्थांमध्ये डॉक्टरांवर होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा घटनांमुळे वैद्यकीय सेवांवर परिणाम होत असल्याचे संघटनांनी नमूद केले.

डॉक्टर संघटनांनी महाराष्ट्र सेवा संस्था हिंसाचार व मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम-२०१० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या प्रकरणांत तातडीने गुन्हे दाखल करणे, निश्चित कालमर्यादेत तपास पूर्ण करून जलदगती न्यायालयातून खटल्यांचा निकाल लावणे आणि पीडितांना नुकसानभरपाईची प्रभावी तरतूद करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

रुग्णालयांमध्ये राजकीय हस्तक्षेप, धमक्या आणि दडपशाहीला पूर्णविराम देण्याची गरज व्यक्त करत, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये २४ तास प्रशिक्षित सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रण, सुरक्षा रक्षक, पोलीस समन्वयक आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय राज्यभर ‘झिरो टॉलरन्स अगेन्स्ट हेल्थकेअर व्हायोलन्स’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच संपूर्ण देशात एकसमान आणि कठोर ‘केंद्रीय हेल्थकेअर व्हायोलन्स प्रिव्हेन्शन ॲक्ट’ तातडीने लागू करण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशीही मागणी करण्यात आली.

डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना सुरक्षित, सन्मानपूर्वक व निर्भय वातावरणात सेवा देता यावी, यासाठी शासनाने कायदेशीर आणि प्रशासकीय हमी द्यावी, असेही संघटनांनी स्पष्ट केले आहे.

मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास राज्यभरातील वैद्यकीय संघटनांना एकत्र येऊन तीव्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी डॉक्टर्स असोसिएशन, देऊळगाव राजाचे अध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, सचिव डॉ. प्रवीण तिडके, कोषाध्यक्ष डॉ. अतुल गीते, निमा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विशाल शिंदे, सचिव डॉ. पवनकुमार डोईफोडे, कोषाध्यक्ष डॉ. बालाजी तायडे तसेच आयएमए, देऊळगाव राजाचे अध्यक्ष डॉ. सुभाष शिंगणे, सचिव डॉ. निखिल शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. अरविंद भगत यांच्यासह डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये