जिवती तालुक्यातील वयोवृद्धांच्या पेन्शनला बायोमेट्रिक अडथळा

चांदा ब्लास्ट
जिवती :- तालुक्यातील ६० ते ६५ वर्षे वयोगटातील अनेक वयोवृद्ध महिला व पुरुषांचे आधार पडताळणीवेळी हाताचे ठसे (फिंगरप्रिंट) व डोळ्यांची (आयरिस) पडताळणी मशीनवर जुळत नसल्यामुळे त्यांचे हयात प्रमाणपत्र तयार होत नाही. परिणामी, संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेअंतर्गत मिळणारे सानुग्रह अनुदान (पेन्शन) गेल्या वर्षभरापासून बंद असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
आधार अद्ययावत करण्यासाठी संबंधित लाभार्थी आधार केंद्रावर जात असले तरी वयोमानामुळे त्यांचे बायोमेट्रिक तपशील मशीनवर स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा असूनही ती बँकेत होल्ड दाखवत असल्याचे सांगितले जात आहे. हयात प्रमाणपत्र निघत नसल्याने लाभार्थींना पेन्शन मिळणे कठीण झाले आहे.अनेक वयोवृद्ध निरक्षर असून त्यांच्यासोबत मदतीसाठी कोणीही नसते. त्यामुळे ते दररोज तहसील कार्यालयात कागदपत्रे घेऊन हेलपाटे मारत असून मानसिक व शारीरिक त्रास सहन करत आहेत. अनेकांचे उदरनिर्वाह आणि औषधोपचार हे या पेन्शनवरच अवलंबून आहेत.
त्यांची मुले रोजगारासाठी मुंबई, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत वास्तव्यास असल्याने वृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या गंभीर प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन संबंधित लाभार्थ्यांची पेन्शन पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी जिवती पंचायत समितीचे माजी सभापती सुग्रीव गोतावळे, तिरुपती पोले, मारुती मोरे, महादेव शेंबडे, प्रदीप काळे आणि अजगर शेख यांनी केली आहे.
यासंदर्भातील निवेदन नायब तहसीलदार हेमंत तेलंग यांना देण्यात आले असून, तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास संपूर्ण तालुक्यातील वयोवृद्ध महिला-पुरुषांना सोबत घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता प्रशासन या प्रश्नावर गांभीर्याने निर्णय घेऊन मार्ग काढणार का, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे



