संकटात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची धडपड यशस्वी; असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय
आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद ; पुढील २ ते ३ दिवसांत असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडणार

चांदा ब्लास्ट
मुल व सावली तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; धान पिकांना मिळणार नवसंजीवनी
आ.मुनगंटीवार यांची जिल्हाधिकारी व मुख्य अभियंत्यांशी थेट चर्चा; शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याची आग्रही मागणी
चंद्रपूर : मुल व सावली तालुक्यातील पावसाच्या खंडामुळे संकटात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली धडपड अखेर यशस्वी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना जीवदान मिळावे, या उद्देशाने त्यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना पत्र पाठवून असोलामेंढा प्रकल्पातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. याचबरोबर गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अजय दाभाडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही तातडीने कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने असोलामेंढा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून, पुढील २ ते ३ दिवसांत पाणी सोडण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाने अधिकृत पत्राद्वारे कळविले आहे.
मुल तालुक्यातील नांदगाव, बेंबाळ, जुनासुर्ला तसेच सावली तालुक्यातील सावली, पाथरी, निमगाव, व्याहाड, कापसी, खेडी आणि साखरी परिसरात पावसाने मोठा खंड पडल्याने धानाची रोपे करपू लागली होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात येताच आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे उभे पीक वाचविण्यासाठी असोलामेंढा प्रकल्पातून त्वरित पाणी सोडण्याची मागणी केली. पत्रव्यवहाराबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांनी या विषयाचा पाठपुरावा केला.
आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत असोलामेंढा प्रकल्प पुनर्निर्माण विभाग, सावली यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल बैठकीद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीतील चर्चेनंतर पुढील २ ते ३ दिवसांत असोलामेंढा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ विधानसभेत मांडण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या अडचणीला प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. या प्रकरणातही पत्र, दूरध्वनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण समन्वय साधत त्यांनी प्रशासनाला तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडले.
असोलामेंढा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने मुल व सावली तालुक्यातील शेकडो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा दिलासा मिळणार असून, पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या संकटातून त्यांना सावरण्यास मोठी मदत होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रभावी पाठपुराव्यामुळे धान पिकांना वेळेवर पाणी मिळणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आ.मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.



