ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दैनंदिन गुजरीतील रस्त्यांची दुरुस्ती करा
भाजयुमोचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या दैनंदिन गुजरीमध्ये पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून नागरिक व दुकानदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गुजरी परिसरात मुरूम टाकून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, ब्रम्हपुरी शहरच्या वतीने बाजार समिती प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दैनंदिन गुजरीमध्ये दररोज हजारो नागरिक खरेदी-विक्रीसाठी येत असतात. मात्र सततच्या पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून नागरिक, शेतकरी व दुकानदारांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अस्वच्छता वाढली असून अपघात होण्याची तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.यामुळे बाजार समिती प्रशासनाने तातडीने गुजरी परिसरात मुरूम टाकून अंतर्गत रस्ते वाहतुकीस योग्य करावेत व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजयुमोने केली आहे.प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, ब्रम्हपुरी शहरच्या वतीने बाजार समिती प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना भाजयुमो शहर अध्यक्ष अमित रोकडे,महामंत्री पंकज माकोडे, उपाध्यक्ष बंटी येरावार,अक्षय झुरमुरे,भरत सावकार,सचिव केतन पेशने, कोषाध्यक्ष रोशन कावळे,गणेश जोगे,शुभम बोरसरे,जगदीश दोनाडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


