ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा येथे मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घोषित करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ ची सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज, १ जुलै २०२६ रोजी एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जालना रोडवरील जिजाऊ सृष्टी सभागृहात दुपारी ३.०० वाजता ही बैठक पार पडली.

२४-सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

महाराष्ट्र राज्यासह १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व संबंधित यंत्रणेला अनेक महत्त्वपूर्ण कामे कालमर्यादेत पूर्ण करावी लागणार आहेत.

महत्त्वाच्या कामांचा आढावा व सूचना

बैठकीत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी आणि पर्यवेक्षकांना कामाचा वेग वाढवण्याच्या व पारदर्शकतेच्या सूचना दिल्या. प्रामुख्याने खालील विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा व आढावा घेण्यात आला:

 *घरभेटी व मतदार पडताळणी:* घरभेटी देऊन नवीन मतदार नोंदणी, वारस नोंदणी आणि स्थलांतरित मतदारांची पडताळणी करणे.

 *दुबार व मृत मतदार शोधणे* : मतदार यादीतील मृत मतदार आणि दुबार नोंदी शोधून काढणे.

 *डिजिटल अद्यावतीकरण* : ‘Enumeration Form’ चे मतदारांना वाटप करणे, नागरिकांकडून ते कागदपत्रांसह भरून घेणे आणि ही माहिती ‘ERONET’ आज्ञावली व डिजिटल प्रणालीवर स्कॅन करून अपलोड करणे.

 *अॅपचा वापर व नोटीसा* : मतदारांच्या सुनावणी बाबतच्या नोटीसा बजावणे व त्याबाबतचे अहवाल संबंधित अॅपमध्ये वेळेत अपलोड करणे.

 *३० जून ते २९ जुलै २०२६ हा पहिला टप्पा >*

 निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वरील सर्व प्राथमिक कामे दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

 *पुढील नियोजित कार्यक्रम (५ ऑगस्ट ते ७ ऑक्टोबर २०२६)*

या पुनरीक्षण कार्यक्रमानुसार ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर दावे व हरकती स्वीकारणे, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करणे आणि मतदारांना नोटीसा बजावणे ही कामे पूर्ण करून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेता, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली आणि लोणार येथील गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) त्यांच्या स्तरावरून सर्व ग्रामपंचायत संगणक चालकांना या कामात उपस्थित व सक्रिय राहण्याचे आदेश देण्याचे निर्देशही यादरम्यान देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाचे हे कार्य वेळेत व अचूकपणे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी केले आहे.

बैठकीला २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार सिंदखेड राजा अजित दिवटे, तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, गटविकास अधिकारी सिंदखेड राजा अजित बांगर, गटविकास अधिकारी लोणार श्री.देशमुख, नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे,श्री संदिप बंगाळे नायब तहसीलदार,रचना जाधव उपअधीक्षक भूमी अभिलेख,गट शिक्षण अधिकारी सिंदखेड राजा स्वप्नील निकम,नागेश खरात सहाय्यक महसूल अधिकारी, रामेश्वर कहाळे सहाय्यक महसुल अधिकारी, गणेश देशमुख,गट शिक्षण अधिकारी देऊळगाव राजा व अन्य वरिष्ठ अधिकारी संजय सोनुने महसूल सहाय्यक तालुका अध्यक्ष राजु भाऊ खरात महसूल सेवक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये