वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी “मेडिसिन फ्री लाईफ व स्ट्रेस मॅनेजमेंट”
कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दैनंदिन कर्तव्यातील ताणतणाव दूर करून त्यांना सुदृढ व निरोगी आयुष्य जगता यावे, या उद्देशाने आज दिनांक ०९ जून २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातील क्राईम मीटिंग हॉल, वर्धा येथे “मेडिसिन फ्री लाईफ व स्ट्रेस मॅनेजमेंट” (औषधमुक्त जीवन आणि ताणतणाव व्यवस्थापन) या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. ओमकार हलमारे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांना आधुनिक जीवनशैलीत औषधांशिवाय कसे निरोगी राहावे, याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात वाढत्या ताणतणावामुळे निर्माण होणारे आजार जसे की, मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (Blood Pressure), हृदयविकार, आम्लपित्त (Acidity), पोटाचा त्रास आणि बद्धकोष्टता यांसारख्या व्याधींवर नैसर्गिक उपचार पद्धतीचा वापर करून कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येते, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
डॉ. ओमकार हलमारे यांनी ताणतणाव आणि शरीरातील ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी व रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी विविध नैसर्गिक व पर्यायी उपचार पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये मॉर्निंग वॉक, योगासने, प्राणायाम, अॅक्युप्रेशर थेरपी, हर्बल थेरपी आणि मॅग्नेटिक थेरपीचे शरीराला होणारे फायदे समजावून सांगितले. तसेच तात्काळ तणावमुक्तीसाठी ‘हेड मसाज थेरपी’, ५ ते १० मिनिटांची ‘वॉटर ड्रिप थेरपी’, ‘अरोमा थेरपी’ आणि ‘म्युझिक थेरपी’ यांसारख्या आधुनिक व सोप्या तंत्रांची माहिती दिली. यासोबतच CLC (Clapping, Laughing, Crying – टाळ्या वाजवणे, हसणे आणि भावना मोकळ्या करणे या थेरपीच्या माध्यमातून मनातील ताण कसा हलका करावा, याचे थेट प्रात्यक्षिक त्यांनी उपस्थितांकडून करून घेतले.
या कार्यशाळेला वर्धा जिल्ह्यातील पोलीस ठाणे व विविध शाखांमधील सर्व म्हणजे एकूण ३४ अधिकारी व १५५ अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये वर्धा शहर, रामनगर, सेवाग्राम, सावंगी, सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर, वडनेर, गिरड, आर्वी, आष्टी, कारंजा, तळेगाव, पुलगाव, खरांगणा, देवळी, अल्लीपूर या पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखा (LCB), सायबर सेल, भरोसा सेल, डायल ११२, वायरलेस शाखा, दोषसिद्धी शाखा, वाचक शाखा व पोलीस मुख्यालय (पो.मु.) येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेत शिकवलेल्या पद्धतींचा अवलंब करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि तणावमुक्त होऊन जनतेची सेवा करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले. उपस्थित सर्व पोलीस अंमलदारांनी या उपक्रमाचे कौतुक केले व हा उपक्रम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले. सदरच्या कार्यशाळेचे आयोजन पोलिस अधीक्षक वर्धा यांचे मार्गदर्शनात कल्याण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक श्री आशिष चीलांगे आणि शाखेतील अंमलदारांनी केले
(आशिष चिलांगे), सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा.



