जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दुधाळा तलाव परिसरात स्वच्छता अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईको-प्रो तथा ईकॉर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुधाळा तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अभियानादरम्यान दुधाळा तलाव परिसराची स्वच्छता करून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला व परिसर प्लास्टिकमुक्त करण्यात आला. यामुळे पावसाळ्यात तलावात जमा होणारे पाणी प्रदूषणमुक्त राहण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी निर्माल्य विसर्जनाबाबत जनजागृती करणारे फलक तलाव परिसरात लावण्यात आले. तसेच नागरिकांनी निर्माल्य पाण्यात न टाकता स्वतंत्र संकलन कुंडामध्ये जमा करावे, यासाठी जनजागृती करण्यात आली.
दरम्यान, ईको-प्रो व ईकॉर फाउंडेशनच्या वतीने भद्रावती नगर परिषदेला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे दुधाळा तलाव परिसरात वर्षभर कायमस्वरूपी निर्माल्य संकलन कुंड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा, जलस्रोत स्वच्छ ठेवावेत आणि निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. या अभियानात ईको-प्रो तर्फे संदिप जिवने, किशोर खंडाळकर, संतोष रामटेके, अमोल दौलतकर, अभिनव लोहकरे व कल्पना बांधुरकर यांनी सहभाग घेतला. तसेच ईकॉर फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रगती कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विवेकानंद माध्यमिक विद्यालय, भद्रावती येथील विद्यार्थिनी कु. रिया किशोर मडावी, कु. मीरा अरुण गुप्ता, कु. ज्ञानेश्वरी संजय उईके तसेच नवोदय स्पोर्टिंग क्लबचे विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले होते.



