नागपूरच्या एमडी तस्कराला भद्रावतीत ठोकल्या बेड्या
१४ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त : एलसीबीची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) भद्रावती हद्दीत धडक कारवाई करत तब्बल १६८.९४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्जसह कार जप्त केली आहे. या कारवाईत नागपूर येथील एका तस्कराला अटक करण्यात आली असून, एकूण १४,११,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदे, विशेषतः अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ०२ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, नागपूर येथील अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार हा मोठ्या प्रमाणात एम.डी. ड्रग्ज घेऊन भद्रावतीकडे येणार आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तत्काळ कारवाईची रणनीती आखली. कायदेशीर परवानग्या पूर्ण करून नागपूर-भद्रावती मार्गावरील जमघट हॉटेल परिसरात सापळा रचण्यात आला.
०३ जून रोजी पहाटे ००:३५ वाजताच्या सुमारास संशयित पांढऱ्या रंगाची होंडा अमेझ कार घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी करून वाहन ताब्यात घेतले. चालकाची चौकशी केली असता त्याने आपली ओळख अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार (वय ४०, रा. तुकडोजी चौक, नागपूर) अशी सांगितली.
यानंतर राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत वाहनाची व आरोपीची झडती घेण्यात आली. त्याच्या ताब्यातून १६८.९४ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर (अंदाजे किंमत ८,५०,०००/-) आढळून आली. तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली होंडा अमेझ कारही जप्त करण्यात आली. एकूण जप्तीची किंमत १४,११,०००/- इतकी आहे.
या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कलम ८(क), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली विनोद भुरले, सुनील गौरकार, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुट्ठावार, दीपक डोंगरे, इमान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार आदींनी केली.



