ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी, तब्बल बारा विद्यार्थी उत्तीर्ण

जिल्हा परिषद शाळा गोजोली मक्ता येथील विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करून त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे, हा मुख्य उद्देश समोर ठेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा) तालुक्यातील गोजोली मक्ता येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील तब्बल बारा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन नवा इतिहास रचला आहे. प्रथमतःच शिष्यवृत्ती परीक्षेत बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्राथमिक शाळेच्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील गोजोली मक्ता येथील जिल्हा परिषद शाळेतील अगम्य पेंदोर, श्रेया शेडमाके, कृष्णा मडावी, नैतिक आत्राम, नंदिनी शेडमाके, नील बोंगिरवार, रितू मोहूर्ले, रिया टेकाम, सलोनी टेकाम, सारांश शेंडे, शिवानी आत्राम, वेद कुमरे या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शाळेतील शिक्षकांसह पालकांनाही सुखद धक्का देत विद्यार्थ्यांनी “हम भी किसी से कम नहीं!”, म्हणत स्वतःसह शाळेचेही नाव उज्ज्वल केले आहे.

जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर सरकार, वर्गशिक्षिका साधना उराडे, शिक्षक भावेश विश्वास यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनात एकूण १९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले होते, त्यापैकी तब्बल बारा विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याने विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकही भारावून गेले आहेत. विशेषतः गोजोली मक्ता येथील जिल्हा परिषद शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने संपूर्ण तालुक्यात या शाळेविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या नियमित वर्गासोबतच शिष्यवृत्ती परीक्षेकरिता अतिरिक्त वर्ग घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. सोबतच विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित न करता सातत्य, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाचा सराव केल्यानेच हे यश प्राप्त झाले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी मनात घेऊन विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला, तर भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी गाव सोडून बाहेरगावी शिकायला जाणार नाही, हे मात्र निश्चित.

*इंग्रजी “फॅड”ला जोर का झटका..*

आजच्या संगणकीय युगात जिकडे _ तिकडे कॉन्व्हेन्टसह इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाचे “फॅड” असतांना मात्र गोजोली मक्ता येथील विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. गावखेड्यातील मराठी शाळेतील विद्यार्थीही शैक्षणिक क्रांती करण्यात मागे नाहीत, हेच या निकालामुळे स्पष्ट झाले आहे

मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली तेव्हाच निश्चय केला की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी तयार करायचे. त्याच माध्यमातून स्पर्धेच्या युगात आपली जागा निश्चित करण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा हा एक उत्तम मार्ग ठरला. या शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच माझ्यासोबतच सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनात बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा कुठेच कमी नाही, हे सिद्ध झाले.

              *मुरलीधर सरकार, मुख्याध्यापक*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये