
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील मौजा विंजासन तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीची ओळख राजू श्रावण मांढरे अशी झाली आहे.
माहितीनुसार, गुरुवार, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतक राजू मांढरे हे भोई समाजातील असून, समाजाच्या सामाईक मालकीच्या विंजासन तलावात नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा अचानक तोल जाऊन ते पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) केली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेची परिस्थिती याबाबत पुढील तपास सुरू आहे.



