चंद्रपूरच्या पीक विमा हप्ता दरांबाबत आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची गंभीर दखल; मुख्यमंत्र्यांनी कृषी सचिवांना दिले अहवालाचे निर्देश
२८ जुलै रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक; चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. मुनगंटीवार यांचा पाठपुरावा निर्णायक टप्प्यात
चंद्रपूर :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरत असलेल्या पीक विमा हप्ता दरांचा प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने मांडत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून कृषी सचिवांना संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या विषयावर २८ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे कृषिमंत्री दत्तात्रयजी भरणे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या शेतकरीप्रती असलेल्या संवेदनशीलतेची आणि बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती देणारी ठरली आहे.
खरीप हंगाम २०२६ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेले पीक विमा दर शेजारील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक असल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. समान भौगोलिक परिस्थिती, हवामान, पर्जन्यमान आणि पीकपद्धती असतानाही चंद्रपूर जिल्ह्यावर वाढीव आर्थिक भार टाकणे अन्यायकारक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी ठामपणे मांडले होते.
आ. मुनगंटीवार यांनी शासनाकडे चंद्रपूर जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पीक विमा हप्त्याचा तातडीने फेरविचार करून, त्यातील विसंगती दूर करत शेजारील जिल्ह्यांप्रमाणे वाजवी दर लागू करण्याची मागणी केली होती. तसेच, सुधारित दर निश्चित होईपर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत वाढवावी, जेणेकरून कोणताही शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार नाही, अशीही मागणी त्यांनी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयाची गंभीर दखल घेत कृषी सचिवांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ जुलै रोजी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याच्या पीक विमा दरातील विसंगती दूर करून शेतकऱ्यांना न्याय देणारा निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



