19 जुलै रोजी श्रीपतभाऊ राठोड यांच्या कार्याचा अकोल्यात होणार सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अकोला :_ वसंतरावजी नाईक अधिकारी-कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा, अकोला यांच्या वतीने 19 जुलै रोजी ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे ,’वसंतराव नाईकांनंतरचा महाराष्ट्रातील राजकीय प्रवाह’ या विषयावर मा. दिलीप एडतकर, मुख्य संपादक, दै. विदर्भ मतदार, अमरावती यांचे व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. इंजि. अमर राठोड, संस्थापक अध्यक्ष, वसंतरावजी नाईक अधिकारी-कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, हे राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मा. मोहन राठोड (सेवानिवृत्त माहिती उपसंचालक, पुणे), मा. डॉ. अरविंद आडे (संघटनेचे कोषाध्यक्ष), मा. संदीप राठोड (उपाध्यक्ष) तसेच मा. राजू चव्हाण (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य) यांची उपस्थिती लाभणार आहे.
व्याख्यानमालेचे हे पंधरावे वर्ष असून, त्यानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा, शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, पीएच.डी. प्राप्त गुणवंतांचा, तसेच वर्ष २०२४ ते २०२६ या कालावधीत उत्कृष्ट साहित्यनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचा आणि संघटनेच्या वाढीसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सदस्यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात नागपूर येथील ज्ञानप्रकाश लोकसंस्था चे अध्यक्ष श्रीपतभाऊ राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्या नावाने जमिनीपासून पन्नास फूट उंचीवर कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण परसबाग निर्मितीचा प्रयोग अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या साकारला आहे. लागणारी आवश्यक फळे, हंगामानुसार सर्व प्रकारचा रसायनमुक्त भाजीपाला तसेच विविध हंगामी पिके जैविक पद्धतीने घेऊन त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. कृषी क्षेत्रातील या नाविन्यपूर्ण प्रयोगाची दखल घेऊन संघटनेच्या वतीने त्यांच्या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी जानोरकर मंगल कार्यालय, रिंग रोड, अकोला येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संघटनेचे सरचिटणीस मा. राजूभाऊ चव्हाण यांनी श्रीपतभाऊ राठोड यांच्या कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व दिशादर्शी प्रयोगाची माहिती प्रस्तुत केली.



