ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूसमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ समर्थन रॅली

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एकजुटीचे आवाहन

चांदा ब्लास्ट

घुग्घूस/चंद्रपूर : राजधानी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या जनआंदोलनाला तसेच प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ घुग्घूस येथे सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी समर्थन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सकाळी ११ वाजता गांधी चौक येथून काढण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आवाहनानुसार, ‘घुग्घूस परिवार’ यांच्या वतीने आयोजित या रॅलीचा उद्देश मुलांचे उज्ज्वल भविष्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, जनहिताशी संबंधित प्रश्न तसेच लोकशाही मूल्यांप्रती एकजूट आणि समर्थन व्यक्त करणे हा आहे. आयोजकांनी शहरातील नागरिक, युवक, विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, ही रॅली कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेच्या विरोधासाठी नसून शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि नागरिकांच्या अधिकारांशी संबंधित मुद्द्यांवर शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आयोजकांनी भावनिक आवाहन करताना म्हटले की, “आमची लढाई कोणाविरुद्ध नाही, तर आपल्या हक्कांसाठी आणि मुलांच्या भविष्याकरिता आहे.” लोकशाही मूल्यांचा सन्मान राखत घुग्घूसमधील सर्व नागरिकांनी या रॅलीत सहभागी होऊन जनहिताच्या या अभियानाला यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरभर व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. घुग्घूसमधील नागरिक मोठ्या संख्येने गांधी चौक येथे उपस्थित राहून शिक्षण, जनहित आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीचा संदेश देतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये