सोनम वांगचुक यांनी विरोधकांचे ‘अस्त्र’ होवू नये-डॉ.ऍड.संदीप ताजने
'कॉकरोच जनता पार्टी'च्या मागे कॉंग्रेसचा 'हात'

वाशिम/नागपूर :- देशातील राजकीय वातावरण जाणीवपूर्वक तापवून त्याचा थेट राजकीय फायदा लाटण्यासाठी विरोधकांकडून लडाखचे आंदोलक सोनम वांगचुक यांचा ‘अस्त्र’ म्हणून वापर केला जात असल्याचा घणाघाती आरोप बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.ऍड.संदीप ताजने यांनी केला आहे. कथित ‘कॉकरोज जनता पार्टी’ (सीजेपी) च्या मागे प्रत्यक्षात काँग्रेसचाच हात आहे का? हे आंदोलन पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे का? या प्रश्नांचा सरकारने शोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी शनिवारी (ता.१८) केले.
राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलन स्थळावरून वांगचुक यांची खालावलेली प्रकृती लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. दोन दिवसांपूर्वी मा.दिल्ली उच्च न्यायालयाने कुठल्याही नागरिकांचे जीवन हे अमूल्य आहे, असे म्हणत वांगचुक यांची नियमित आरोग्य तपासणी करण्याचे तसेच आवश्यक वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले होते. निर्देशांचे पालन करीत पोलिसांनी उचललेल्या पावलांचे समर्थन करतांना सर्वांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या मूलभूत अधिकारांचे हनन होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ.ऍड.ताजने म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणात विरोधी पक्षनेते राहुल गांधी अत्यंत सावध भूमिका घेत आंदोलनस्थळापासून जाणीवपूर्वक अंतर बाळगून आहेत, असा थेट आरोप डॉ.ऍड.ताजने यांनी केला. एरवी सर्वसामान्यांचे हाल जाणून घेण्यासाठी गल्लीबोळापर्यंत फिरणारे राहुल गांधी या महत्त्वाच्या आंदोलनापासून दूर का? असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
लडाख हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील सीमावर्ती भाग आहे. अशा भागात राजकीय हेतूने प्रेरित आंदोलने करून देशाच्या शांततेला आव्हान देण्याचा प्रयत्न वांगचुक यांच्या माध्यमातून विरोधक करत आहेत. देशातील मूळ समस्या, शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ही ‘पॉलिटिकल स्टंटबाजी’ सुरू आहे. हे राजकीय कारस्थान वेळीच ओळखून जनतेने भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ.ऍड.ताजने यांनी केले.



