ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोटनिंबाळा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट अखेर पिंजऱ्यात जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती वनपरिक्षेत्रातील घोटनिंबाळा, चालबर्डी, कचराळा, गोंड नुन्हारा, लोणारा पारखी तसेच आयुध निर्माणी चांदा परिसरातील इंद्रप्रस्थ गार्डनमागील रामटेके सोसायटी परिसरात गेल्या महिनाभरापासून दहशत निर्माण करणारा बिबट अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बिबट्याने मागील एक महिन्याच्या कालावधीत सुमारे २० कालवडी, वासरे आणि इतर पाळीव जनावरे फस्त केली होती. त्यामुळे घोटनिंबाळा, लोणारा पारखी, चालबर्डी, कचराळा, देऊळवाडा आणि रामटेके सोसायटी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बिबट्याचा वाढता वावर आणि जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांची गंभीर दखल घेत वनविभागाने घोटनिंबाळा परिसरात पिंजरा लावला होता. अखेर सोमवारी पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास बिबट पिंजऱ्यात अडकला. पकडण्यात आलेला बिबट अंदाजे चार ते साडेचार वर्षांचा नर असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

बिबट जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अनेक दिवसांपासून जनावरांच्या सुरक्षेची चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट पकडल्याने आता गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ही कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक तरसे यांच्या नेतृत्वात भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, देवगडे (चालबर्डी) तसेच पवन मांढरे, प्रफुल (टिंकू) मांढरे, राजू कुळमेथे, शैलेश कुळसंगे, अनिल शेंद्रे, किशोर मडावी आणि कपिल झाडे यांनी विशेष सहकार्य केले.

सध्या या बिबट्याला आयुध निर्माणी चांदा परिसरातील वनविभागाच्या गंधा नाला नर्सरीमध्ये निरीक्षण व विश्रांतीसाठी ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला पुढील काही दिवसांत जंगलातील निर्जन आणि सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये