ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमराई प्रभागात रस्त्यावर पडलेली HVDC तार ठरतेय धोकादायक; जबाबदार कोण?

मुख्य मार्गावरील वर्षानुवर्षांची दुर्लक्षाची कहाणी, अपघाताची वाट पाहतोय प्रशासन?

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : अमराई प्रभाग क्रमांक ११ मधील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून एक जाडजूड HVDC लाईनची तार जमिनीवर पडलेली असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ही तार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) च्या विद्युत वाहिनीच्या अत्यंत जवळ असल्याचे सांगितले जात असूनही संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, ही लाईन मागील दोन-तीन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. मात्र तिची तार आजही रस्त्याच्या कडेला तसेच काही ठिकाणी जमिनीला लागून पडलेली आहे. जर ही लाईन पूर्णपणे निष्क्रिय असेल, तर ती हटविण्याची कारवाई अद्याप का करण्यात आली नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच, जर या तारेत कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह असण्याची शक्यता असेल, तर ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरू शकते.

हा मार्ग एसीसी, टिळकनगर, अमराई, बहादे लेआउट आणि परिसरातील इतर वसाहतींना जोडणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. दररोज शेकडो दुचाकीस्वार, पादचारी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्याचा वापर करतात. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेली ही विशाल तार कोणत्याही क्षणी गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकते.

परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्युत विभाग, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर असेल. इतक्या दीर्घकाळापासून रस्त्यावर पडलेल्या या धोकादायक तारेकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांचे असेही म्हणणे आहे की, निवडणुकांच्या काळात विकास आणि सुरक्षेच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यावर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करतात. ही बाब प्रशासनातील उदासीनता आणि जबाबदारीच्या अभावाचे द्योतक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

स्थानिक नागरिकांनी नगरसेवक, नगरसेविका तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून तार सुरक्षितपणे हटविण्याची व्यवस्था करावी, तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात उच्चस्तरीय कारवाईसाठी प्रस्ताव व निवेदन पाठवावे, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वृत्त लिहिले जाईपर्यंत संबंधित विभागाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन समोर आले नव्हते. मात्र परिसरातील नागरिकांनी या प्रकरणाला गंभीर सुरक्षेचा प्रश्न मानत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. आता प्रशासन दुर्घटनेची वाट पाहणार की नागरिकांच्या चिंतेची दखल घेत त्वरित उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये