सावली वनपरिक्षेत्रात जंगली हत्तींचा धुमाकूळ
सात गावांना सतर्कतेचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ वनपरिक्षेत्रातील पाथरी परिक्षेत्रात जंगली हत्तींचा कळप दाखल झाल्याने वनविभाग आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींचा वावर असोला चक, उसरपार चक, उसरपार तुकूम, मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा आणि जनकापूर या गावांच्या परिसरात आढळून आल्याने वनविभागाने तातडीने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हालचाली वाढत असून आता हा कळप पाथरी परिक्षेत्रात पोहोचल्याने शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हत्तींचा वावर वाढत असल्याने नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
वनविभागाच्या सूचनेनुसार नागरिकांनी रात्री घराबाहेर जाणे टाळावे, हत्ती दिसल्यास त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करू नये. हत्ती रस्ता ओलांडत असल्यास सुरक्षित अंतर ठेवून थांबावे. कोणत्याही परिस्थितीत हत्तीला हाकलण्याचा अथवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
वन अधिकाऱ्यांच्या मते, जंगली हत्ती बिथरल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. गावांमध्ये वनविभागाच्या पथकांकडून सतत पाहणी सुरू असून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
हत्ती दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली यांनी केले आहे.
दरम्यान, सात गावांच्या परिसरात जंगली हत्तींचा वावर सुरू असल्याने नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची व कुटुंबीयांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.



