ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक पातळीवर झेप

कोरपन्याच्या श्वेता केंब्रिज विद्यापीठातून एमबीए फायनान्स

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

 कोरपना – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश संपादन करण्याची क्षमता असते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत मूळच्या कोरपना तालुक्यातील पिंपरी (नारंडा) येथील रहिवासी तथा सध्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे वास्तव्यास असलेले मायनिंग अभियंता किशोर उद्धव जेनेकर यांची कन्या श्वेता किशोर जेनेकर हिने इंग्लंडमधील जागतिक कीर्तीच्या केंब्रिज विद्यापीठ अंतर्गत असलेल्या किंग्स कॉलेज मधून एमबीए फायनान्स पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे कोरपना तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

इसवी सन १४४१ मध्ये राजा हेन्री सहाव्यांनी स्थापन केलेले किंग्स कॉलेज हे जगातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. तब्बल ५८४ वर्षांची ऐतिहासिक आणि वैचारिक परंपरा लाभलेल्या या महाविद्यालयाने जगभरातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. स्वतंत्र विचारसरणी, संशोधन आणि जागतिक नेतृत्व निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणे हा श्वेतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय अनुभव ठरला आहे. विशेष म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या महान व्यक्तींनीही केंब्रिज विद्यापीठाशी शैक्षणिक नाते जोडले होते. अशा जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून श्वेताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. अलीकडेच पार पडलेल्या भव्य पदवीदान समारंभात श्वेताला एमबीए फायनान्स  पदवी प्रदान करण्यात आली.

तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्वेताने आपले प्राथमिक शिक्षण आदिलाबाद येथे पूर्ण केले. त्यानंतर हैदराबाद येथील डीआरएस इंटरनॅशनल स्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे नागपूर येथील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून बी.ई. आर्किटेक्चर पदवी संपादन केली.

शिक्षणातील सातत्य, मेहनत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची जिद्द यामुळेच तिने हे यश मिळवले. कोरपना तालुक्यातील ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या मुलीने केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची ही बहुधा पहिलीच घटना असल्याने परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्वेताच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनाही जागतिक स्तरावर शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. आपल्या यशाचे श्रेय श्वेताने आई-वडील, कुटुंबीय आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये