ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांवर ‘एआय’ची करडी नजर

नागपूर विभागात हायटेक सुरक्षा व्यवस्था

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्त आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी उन्हाळी परीक्षांसाठी नागपूर विभागातील परीक्षा केंद्रांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॅमेरे बसविण्यात येणार असून, संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर डिजिटल पद्धतीने देखरेख ठेवली जाणार आहे. नागपूर विभागात एकूण ७९ अभ्यास केंद्रांवर परीक्षा होणार असून, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतील तब्बल ५५ हजार ८४ परीक्षार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा प्रक्रिया सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तांत्रिक सुरक्षेची मजबूत यंत्रणा उभारली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, परीक्षा नियंत्रक डॉ. भटूप्रसाद पाटील तसेच नागपूर विभागीय संचालक डॉ. धनंजय वेळूकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून परीक्षा व्यवस्थापनासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत.परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. संशयास्पद हालचाली अथवा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना मिळणार असून, आवश्यक ती कारवाईही त्वरित केली जाणार आहे. त्यामुळे कॉपीसारख्या प्रकारांना मोठ्या प्रमाणावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रश्नपत्रिका वितरणापासून उत्तरपत्रिकांच्या संकलनापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल सुरक्षेखाली पार पडणार आहे. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका सुरक्षित ऑनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार असून, डाउनलोड प्रक्रियेचे संपूर्ण रेकॉर्डिंग ठेवले जाणार आहे. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका गोळा करून सीलबंद करण्याची प्रक्रिया देखील सीसीटीव्ही देखरेखीखाली होणार आहे.

त्रिस्तरीय तांत्रिक सुरक्षेमुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण बनवण्याच्या दिशेने मुक्त विद्यापीठाने टाकलेले हे पाऊल शैक्षणिक क्षेत्रात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये