वचनांची रोशनी की अंधाराचे राजकारण? – भाग २
स्ट्रीट लाईट प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांवर वाढता दबाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून आता स्थानिक राजकारण अधिक तापू लागले असून, विशेषतः स्ट्रीट लाईटच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि नगर परिषद प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणुकीदरम्यान “प्रमुख मार्गांवर स्ट्रीट लाईट लावण्यात येईल” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक भाग अजूनही अंधारात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील अनेक वार्डांमध्ये रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसते. काही ठिकाणी इलेक्ट्रिक पोल उभे असले तरी त्यावर दिवे नसल्याची किंवा अनेक लाईट बंद अवस्थेत असल्याची तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत. यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रात्री कामावरून परतणाऱ्या कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याची चर्चा आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, बैठका, निवेदने आणि घोषणांमध्ये विकासाचे दावे केले जातात; परंतु प्रत्यक्षात रस्त्यांवरील परिस्थिती वेगळीच आहे. काही भागांमध्ये महिनोनमहिने स्ट्रीट लाईट बंद असल्याच्या तक्रारी असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
विरोधकांकडूनही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली जात आहे. नगर परिषद कार्यालयासमोर अनेकदा आंदोलन करण्यात आले असून, मासिक सभांमध्ये स्ट्रीट लाईटचा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला आहे. तरीही परिस्थितीत ठोस बदल दिसून न आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजकीय वर्तुळात आता अशीही चर्चा सुरू झाली आहे की, शहरातील समस्या फक्त कागदोपत्री सोडवल्या जात आहेत का? कारण अहवालांमध्ये “काम सुरू आहे” किंवा “प्रक्रिया सुरू आहे” असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक भाग अंधारातच आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी रात्री प्रत्यक्ष शहरात फेरफटका मारल्यास वास्तव समोर येईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त जबाबदारी मानली जाते. त्यामुळे निवडणुकीत दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिक प्रश्न उपस्थित करू लागणे स्वाभाविक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, कोणत्याही सत्ताधारी पक्षाची खरी कसोटी निवडणुकीनंतर सुरू होते. कारण जनता केवळ जाहिरनामे किंवा भाषणे लक्षात ठेवत नाही, तर प्रत्यक्षात झालेल्या कामांच्या आधारे आपला विश्वास व्यक्त करते. त्यामुळे आगामी काळात स्ट्रीट लाईटचा प्रश्न हा स्थानिक राजकारणातील मोठा मुद्दा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की, सत्ताधारी पक्ष आपल्या जाहिरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करून शहराला प्रकाश देणार की हा मुद्दा पुढील निवडणुकांपर्यंत केवळ राजकीय चर्चेपुरताच मर्यादित राहणार? सध्या मात्र शहरातील अंधारे रस्ते प्रशासनाकडून उत्तरांची अपेक्षा करताना दिसत आहेत.



