ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल डिपोविरोधात ग्रामस्थांचा अल्टिमेटम

प्रशासनाच्या शांततेवर गंभीर प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : एकीकडे सरकार विकास, पर्यावरण संतुलन आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मोठमोठ्या घोषणा करत असताना दुसरीकडे प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे दिसून येत आहे. नागाळा (सी.) येथील नागरिकांनी आता प्रशासनाविरोधात उघडपणे मोर्चा उघडत कोल डिपो बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र निवेदन सादर केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शासन-प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

ग्रामस्थांच्या आरोपानुसार, गावालगत सुरू असलेल्या कोल डिपोमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे रस्तेही कथितरीत्या बंद केले जात असल्याने शेती व्यवसायासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक वर्षांपासून तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोल डिपो संदर्भात अनेक वेळा प्रशासनाला माहिती देण्यात आली, मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांवरच बोळवण करण्यात आली. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास गावातील जनजीवन आणखी कठीण होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आता सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, प्रशासन केवळ कागदोपत्री आश्वासनांपुरते मर्यादित राहणार की सामान्य नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार? प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या अशा प्रकरणांना राजकीय संरक्षण मिळत आहे का? आणि स्वतःच्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागत आहे, ही परिस्थिती का निर्माण झाली?

सध्या नागाळा गावात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण असून येत्या काही दिवसांत हा मुद्दा राजकीयदृष्ट्याही अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये