ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट येथील चोरी प्रकरणातील आरोपी मध्यप्रदेशातून अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दाखल असलेल्या अप.क्र. 780/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या पथकाने मध्यप्रदेश राज्यातून शिताफीने अटक करून गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे.

पोलीस स्टेशन हिंगणघाट अप.क्र. 780/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता मधील फिर्यादी यांची पैशांनी भरलेली थैली अज्ञात आरोपीने हिंगणघाट येथील मार्केट परिसरातून चोरी केली होती. गुन्हा घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी नामे संजय सिंह उर्फ बुद्देश्वर सिंह करवल, वय 40 वर्ष, रा. राजगड, तह. मढीयान, जि. मिर्झापूर, उत्तरप्रदेश हा गुन्हा करून वर्धा मार्गे छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे पळून गेल्याची माहिती मिळाली.

माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तातडीने छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे रवाना करण्यात आले. तेथे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी पुढे रेल्वेने देवास येथे गेल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे तपास पथक तात्काळ देवास, मध्यप्रदेश येथे रवाना झाले, देवास रेल्वे स्टेशन व परिसरात सापळा रचून आरोपीस पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने दिनांक 15/05/2026 रोजी हिंगणघाट येथील मार्केट परिसरातून फिर्यादी यांची पैशांची थैली चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच पुढील चौकशीदरम्यान आरोपीने दिनांक 02/05/2026 रोजी दुपारी हिंगणी ता. सेलू येथे मोपेड गाडीच्या डिक्कीतून पैसे चोरी केल्याचीही कबुली दिली. त्यानुसार पोलीस स्टेशन सेलू येथे दाखल अप.क्र. 358/2026 कलम 303(2) बीएनएस हा गुन्हादेखील उघडकीस आला आहे. सदर आरोपीकडून एकूण 1,08,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे तसेच पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशीषसिंग ठाकूर, पो.उप.नि. ओमप्रकाश नागापुरे, पो. हवा. अमरदीप पाटील, पवन पन्नासे, आशिष महेशगौरी, दीपक जंगले, पो.अं. रितेश कुऱ्हाडकर, मंगेश आदे, शुभम राउत, सुगम चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच पो.अं. अंकित जिभे, सायबर पो.स्टे., वर्धा यांनी पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये