येल्लापूर व परमडोली मार्गावरील बंद बसफेऱ्यांनी जिवतीकर अडचणीत
बंद बस फेऱ्या तत्काळ सुरू करण्याची निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते दिपक साबने यांची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- अतिदुर्गम व आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील येल्लापूर आणि परमडोली मार्गावरील अनेक महत्त्वाच्या एसटी बसफेऱ्या अचानक बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत असून परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या तात्काळ पूर्ववत सुरू कराव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते दिपक साबने यांनी दिला आहे.
जिवती तालुक्यातील नागरिकांसाठी एसटी बससेवा हीच मुख्य वाहतूक व्यवस्था मानली जाते. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्ण दैनंदिन प्रवासासाठी पूर्णपणे एसटीवर अवलंबून आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून नगराळा मार्गे राजुरा -येल्लापूर मार्गे धावणारी मुक्कामी बसफेरी, सकाळी साडे आठ वाजताची येल्लापूर–चंद्रपूर बस, सकाळी अकरा वाजताची बस तसेच पाटण मार्गे राजुरा – परमडोली मुक्कामी बसफेरी बंद करण्यात आली आहे. याशिवाय परमडोली मार्गावरील सकाळी अकरा वाजताची बससेवाही १ मेपासून बंद करण्यात आली आहे.
या बसफेऱ्या बंद झाल्यामुळे नागरिकांना वैद्यकीय उपचार, शासकीय कामकाज, शिक्षण व दैनंदिन व्यवहारासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे १९८५ ते १९८७ दरम्यान सुरू झालेली आणि अनेक वर्षांपासून परिसराची जीवनवाहिनी ठरलेली सकाळी साडेआठ वाजताची येल्लापूर–चंद्रपूर बसफेरी १५ मे २०२६ पासून कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिपक साबने यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक, राजुरा येथील आगार व्यवस्थापक व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन सर्व बंद बसफेऱ्या तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांच्या सहभागातून आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.



