अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर महसूल विभागाची कारवाई
भद्रावती तहसीलच्या भरारी पथकाची धडक मोहीम : ४ ब्रास रेती जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चंद्रपूरवरून भद्रावतीकडे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव बगमारे (वय ४७, रा. बाबूपेठ, चंद्रपूर) यांच्या ताब्यातील हायवा वाहनातून सुमारे ४ ब्रास रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार भद्रावती तहसील कार्यालयाच्या अवैध गौण खनिजे भरारी पथकाने मंडळ अधिकारी अनिल दडमल यांच्या नेतृत्वात सापळा रचून कारवाई केली.
चंद्रपूरकडून भद्रावतीच्या दिशेने येणारा हायवा अडवून तपासणी करण्यात आली असता वाहनात रेतीचा साठा आढळून आला. संबंधित चालकाकडे रेती वाहतुकीसंदर्भातील कोणतीही वैध परवानगी अथवा रॉयल्टीची कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.
यानंतर महसूल विभागाने हायवा वाहनासह अंदाजे ४ ब्रास रेती जप्त करून पुढील कारवाईसाठी वाहन तहसील कार्यालयाच्या ताब्यात घेतले. या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व गौण खनिज नियमांनुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाच्या भरारी पथकाकडून सातत्याने मोहिमा राबविल्या जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.



