भ्रष्टाचाराच्या आरोपातील “तो” ग्रामपंचायत अधिकारी अखेर निलंबित
ग्रामपंचायत धाबा येथील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे प्रकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत येत असलेल्या धाबा ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी गजानन घुगे यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱी पुलकित सिंह यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश पारीत केला आहे. घुगे यांनी ग्रामपंचायत धाबा ला प्राप्त झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केला होता. घुगे वर कार्यवाही करीत प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचे कौतुक केल्या जात आहे.
गजानन घुगे हे धाबा येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला लाखो रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. या निधीचा विनियोग खर्च करतांना वार्षिक ग्रामविकास आराखड्यात मंजूर कामावर खर्च न करणे, नियोजनातील कामावर मंजूर कामाशिवाय इतर कामावर खर्च करणे, निधी खर्च करतांना नियमबाह्य आर्थिक अनियमितता करणे, गैरव्यवहार तसेच निधीचा अपहार करणे या संपूर्ण बाबी चौकशी अहवालातून सिद्ध झाल्या.
ग्रामपंचायतीच्या या बोगस कारभाराविरोधात काहिनीं उपोषण केले होते. पण नंतर त्यांनी मुख्य उपोषणकर्त्याने आपली तक्रार मागे घेतल्याने यात आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा होती. मात्र रामकृष्ण सांगडे, सचिन फुलझेले, नामदेव सांगडे, सुरज भस्की, मनोज कोपावार यांसह अनेक गावकर्यांनी घुगेच्या बोगस कारनामा प्रकरणी कार्यवाहीची मागणी रेटून धरली. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंघ यांनी घुगे ला निलंबित केले आहे.
*”त्या” ग्रामपंचायतीचीही चौकशी होणार..!*
गजाजन घुगे हे पूर्वी चेकबेरडी, चेकबोरगाव, खरारपेठ व धाबा येथे कार्यरत होते. धाबा ग्रामपंचातीत घुगेनी मोठा घोटाळा केल्यानंतर आता उर्वरित तीन ग्रामपंचायतीची चौकशी होणार आहे. याठिकाणी देखील मोठा घोळ असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे घुगेच्या अडचणीत वाढ़ होण्याची शक्यता आहे.



