ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामभक्तांसाठी आनंदवार्ता : बल्लारशा-अयोध्या रेल्वे सेवेच्या मागणीला दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

चांदा ब्लास्ट

श्रीराम मंदिराशी चंद्रपूरचा भावनिक संबंध अधोरेखित; भाविकांसाठी मोठी सुविधा ठरणार

ताडोबा, विदर्भ आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे सेवेची शक्यता अधिक बळकट

 चंद्रपूर : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारशा जंक्शन ते अयोध्या दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या महत्त्वपूर्ण विषयाला लवकरच गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रेल्वे सेवेच्या माध्यमातून श्रीराम भक्तांना अयोध्येला जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आ. मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेत ही आग्रही मागणी मांडली.

दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, अजय दुबे सदस्य ZRUCC मध्य रेल्वे मुंबई, रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.आ. मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात चंद्रपूर आणि बल्लारशा परिसरातील मोठ्या संख्येने रामभक्त व उत्तर भारतीय नागरिक वास्तव्यास असल्याचे बैठकीत नमूद केले. तसेच अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराशी चंद्रपूर जिल्ह्याचा ऐतिहासिक व भावनिक संबंध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. श्रीराम मंदिराच्या गर्भगृहासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली येथील सागवान लाकडाची निवड करण्यात आली होती, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

बल्लारशा, नागपूर, जबलपूर, प्रयागराज मार्गे अयोध्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाल्यास धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, तसेच स्थानिक नागरिक, भाविक आणि प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होईल, असे आ. मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या मागणीची दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी विषयावर सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या संभाव्य रेल्वे सेवेच्या माध्यमातून विदर्भ आणि उत्तर भारतातील धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक संबंध अधिक दृढ होणार असून चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये