ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, सरकारी नियमांचे पालन करावे

खासदार प्रतिभा धानोरकर यांचे शाळांना आवाहन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : जिल्ह्याचा पारा सध्या ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला असून, ही तीव्र उष्णतेची लाट लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे. या भीषण परिस्थितीचा विचार करूनच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्या व नवीन शैक्षणिक वर्षाबाबत. पत्रकाद्वारे २ मे २०२६ पासून सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या असून, जून महिन्यातही शाळांच्या वेळा मर्यादित ठेवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. तीव्र उन्हामुळे होणारा शारीरिक त्रास लक्षात घेता, कोणत्याही खाजगी शाळेने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये, असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.

शासकीय आदेशानुसार, १५ जून ते २७ जून या कालावधीत शाळा सकाळी ७.०० ते ११.४५ या वेळेतच भरवणे बंधनकारक आहे. मात्र, वाढत्या उष्णतेकडे दुर्लक्ष करून काही खाजगी शाळा केवळ व्यावसायिक कारणांसाठी २ मे नंतरही वर्ग सुरू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४५ अंशांच्या या रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे त्यांच्या जिवावर बेतू शकते, त्यामुळे अशा शाळांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असा स्पष्ट इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सूचनेनुसार, जर जिल्ह्यातील कोणत्याही खाजगी शाळेने प्रशासकीय निर्णयाचे उल्लंघन केले आणि सुट्टीच्या कालावधीत बेकायदेशीरपणे शाळा भरवली, तर महिला काँग्रेसच्या वतीने अशा शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन ‘गांधीगिरी’ मार्गाने आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनांतर्गत नियम तोडणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला गुलाब पुष्प देऊन त्यांच्या चुकीची आणि वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली जाईल.

जिल्हा प्रशासनाने आणि शिक्षण विभागाने जिल्ह्याचे ४५ अंशांचे तापमान लक्षात घेता या निर्देशांची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर कडक लक्ष ठेवावे. पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहावे आणि जर कोणतीही खाजगी शाळा या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास, त्याबाबतची माहिती प्रशासनास किंवा खासदार कार्यालयास द्यावी, असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये