ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुतार समाज बहुद्देशीय संस्था भद्रावती तर्फे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे 

          निःस्वार्थ काम करण्याची वृत्ती आणि वागण्यात खरेपणा असला तर समाजकार्य करण सहज शक्य आहे असे उद्गार महाराष्ट्र विश्वकर्मा मय झाडे सुतार समाज महासंघाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. ज्योतीताई राखुंडे ह्यांनी काढले. प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.

भद्रावती सुतार समाज बहुद्देशीय संस्था भद्रावती तर्फे गेली नऊ वर्षे अविरत प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. या वर्षीसुद्धा जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री भूपेश कायरकर ह्यांनी समाजध्वजाचे ध्वजारोहण केले तर उत्सव समितीचे अध्यक्ष श्री सूर्यभानजी दुधलकर ह्यांच्या शुभहस्ते घटस्थापना आणि प्रभूंच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. त्यानंतर भजन आराधना आणि दहीहंडी संपन्न झाली.

ज्या समाजात आपण जन्मास आलो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून संस्थेने या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड मोफत काढून देण्याचे शिबिर घेण्यात आले.

रक्तदान शिबिरामध्ये २० रक्तदात्यानी स्वेच्छिक रक्तदान केले तर आरोग्य तपासणी शिबिराचा २०० च्या वर लोकांनी लाभ घेतला.

आरोग्य शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लकवा, कॅन्सर आणि हृदयरोग आदी रोगांचे निदान आणि त्यावर उपचार करण्यात आले. तद्वतच १०० पेक्षा जास्त लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड त्वरीत मोफत बनवून देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रक्त संक्रमण अधिकारी ह्यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. ह्या शिबिरामध्ये आपली सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्सेस, स्वयंसेवक ह्यांचा संस्थेच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

जयंतीच्या निमित्ताने आयोजित मुख्य कार्यक्रम महाराष्ट्र विश्वकर्मा मय झाडे सुतार समाज महासंघाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. ज्योतीताई राखुंडे आणि महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सतीश माणूसमारे आणि जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री सूर्यभानजी दुधलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री भूपेश कायरकर उपस्थित होते. 

समाजातील कलावंतांना वाव मिळावा म्हणून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आयोजित नृत्य स्पर्धांमध्ये ३० च्या वर कलावंतांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. सर्वच कलावंतांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या तर विजेत्या आकर्षक शिल्ड, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन सौ गीताताई जयपूरकर ह्यांनी तर आभारप्रदर्शन श्री हर्षल ढवळे ह्यांनी केले. उत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली. जवळपास सातशे समाजबांधवांनी ह्या उत्सवास आपली हजेरी लावली.

हा जयंती उत्सव यशस्वीपणे पार पडण्यासाठी भद्रावती सुतार समाज बहुद्देशीय संस्था भद्रावतीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आणि भद्रावती परिसरातील सर्व सुतार बांधवांनी तन, मन आणि धनाने सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये