महावितरणच्या गुणवंत सोहळ्यात सेलूच्या उपकार्यकारी अभियंत्याचा प्रथम पारितोषिकाने सन्मान…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) वर्धा विभागात सन 2025–26 या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयोजित गुणवंत गौरव सोहळ्यात सेलू येथील उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण शिरपूरकर यांचा प्रथम पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
सदर आर्थिक वर्षात वीज ग्राहकांना तत्पर, दर्जेदार व समाधानकारक सेवा देण्यात शिरपूरकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. तांत्रिक अडचणींचे वेळेत निराकरण, तसेच महसूल वसुलीमध्येही त्यांनी चांगली प्रगती साधली. त्यांच्या कार्यक्षमतेची, कर्तव्यदक्षतेची आणि नियोजनबद्ध कामकाजाची दखल घेत महावितरण प्रशासनाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली.
वर्धा येथील विभागीय कार्यालयात झालेल्या समारंभात कार्यकारी अभियंता नरेश पारधी यांच्या हस्ते शिरपूरकर यांना ‘गुणगौरव पत्र’ व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिरपूरकर म्हणाले की, “हे यश केवळ माझे नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या परिश्रमाचे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे.” भविष्यातही महावितरणची धोरणे प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल सेलू परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


