हिंगणघाट येथील महिला महाविद्यालयात ‘सायबर जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या वतीने जिल्हा महिला महाविद्यालयात नुकताच सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्धा येथील सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थिनी व नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून सायबर पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम, हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत, तसेच पोलीस हवालदार अमेय गजभिये व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांवर प्रकाश टाकला. त्यांनी खालील मुद्द्यांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले:
सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करताना वैयक्तिक माहिती शेअर करू नये, कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये, तसेच ओटीपी (OTP) कोणालाही देऊ नये. फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे. महिलांनी विशेष काळजी घेत सोशल मीडियाचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांनी स्थानिक पातळीवर पोलीस प्रशासन कशा प्रकारे कार्यरत आहे याची माहिती देऊन विद्यार्थिनींना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये ओटीपी फसवणूक, क्यूआर कोड स्कॅम, फिशिंग लिंक, जॉब स्कॅम तसेच सोशल मीडियाद्वारे होणारी फसवणूक (उदा. बनावट प्रोफाइल तयार करणे) यांचा समावेश होता.
यावेळी सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. अज्ञात लिंक किंवा ई-मेल उघडू नयेत, फोन कॉलवर कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये, पिन क्रमांक किंवा ओटीपी कधीही शेअर करू नये, मजबूत पासवर्ड वापरावा आणि दोन-स्तरीय प्रमाणीकरण चा वापर करावा.
कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली.



