ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःची मार्केटिंग व्यवस्था उभी केली पाहिजे _ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांची कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : ग्राहकांकडे खरेदीसाठी पैशाची कमतरता नाही. त्यांची खर्च करण्याची तयारी आहे. परंतू त्यांना शुद्ध आणि दर्जेदार उत्पादने पाहिजे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली उत्पादने अधिक दर्जेदार, गुणवत्तापूर्वक असेल याकडे लक्ष द्यावे. सोबतच स्वतःची स्वतंत्र मार्केटिंग व्यवस्था उभी केली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नियोजन भवन येथे पालकमंत्री डॉ.भोयर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, सनदी लेखापाल विशाल पिंजरकर, अर्थतज्ज्ञ पंकज गेडे, एमसीडीसीचे विभागीय व्यवस्थापक दिपक बेदरकर आदी उपस्थित होते.

कंपन्यांनी मार्केटिंग व्यवस्था उभी करण्यासोबतच मार्केटिंग कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले पाहिजे. यामाध्यमातून उत्पादनांना देश विदेशातील बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या. ही चांगली बाब आहे. परंतू काही कंपन्या केवळ अनुदानासाठी स्थापन होत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे. अनुदान कायमस्वरुपी टिकत नाही. कंपनीच्या माध्यमातून तयार होणारा उद्योग कायमस्वरुपी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान बदलवून टाकणारा ठरू शकतो, असे पालकमंत्री म्हणाले.

शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्या योजना समजून घेऊन त्याचा लाभ आपल्याला कसा घेता येईल, यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे. यासाठी सातत्याने संबंधित विभाग, प्रशासनाच्या संपर्कात राहिले पाहिजे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या काही समस्या, अडचणी, शंका असू शकतात. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात कंपन्यांच्या सुसंवादासाठी वेगळा कक्ष करण्यात यावा तसेच कंपन्यांच्या संचालकांसाठी नियमित कार्यशाळा, बैठका घेण्यात याव्या, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 385 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उद्योग उभे राहात आहे, असे पालकमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी जिल्हाभरातून आलेल्या शेतकरी कंपन्यांच्या संचालकांशी संवाद साधला. कंपन्यांचे उत्पादन, बाजारपेठ, व्यवस्थापन त्यांनी समजून घेतले. तसेच कंपन्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी काय करणे अपेक्षित आहे, याची माहिती संचालकांकडून जाणून घेतली.

सनदी लेखापाल विशाल पिंजरकर यांनी कंपनीची स्थापना, व्यवस्थापक, लेखे आदींची माहिती दिली. पंकज गेडे, दिपक बेदरकर यांनी देखील संचालकांना मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची माहिती दिली. कार्यशाळेस कंपन्यांचे अध्यक्ष, सचिव तथा संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये