ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्ण्यात गॅस टंचाईचा फटका; एजन्सीसमोर नागरिकांची गर्दी, वाहतूक विस्कळीत

ऑनलाईन बुकिंगनंतरही विलंब; वितरणाबाबत संभ्रम, प्रशासनाची धावपळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : शहरासह तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असून, शुक्रवारी शहरातील अतुल एचपी गॅस ग्रामीण वितरक एजन्सीसमोर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

या गर्दीमुळे पोंभुर्णा–मूल–चंद्रपूर मुख्य मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गॅस वितरणातील विलंब, तांत्रिक अडचणी किंवा पुरवठ्याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांनी ऑनलाईन बुकिंग करूनही दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने संतप्त नागरिक एजन्सीसमोर एकत्र जमले. वितरण प्रक्रिया सुरळीत व वेळेत करण्याबाबत संबंधितांकडे मागणी करण्यात आली.

एजन्सीकडे सध्या सिलेंडर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांना याचा मोठा फटका बसत असून, त्यांच्या दैनंदिन स्वयंपाक व्यवस्थेवर परिणाम होत आहे.

दरम्यान, अचानक वाढलेल्या गर्दीमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. नागरिकांना समजावून सांगत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. नागरिकांनी संयम राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गॅस टंचाईमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, नियमित व वेळेवर गॅस पुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये