वैद्यकीय पदवी म्हणजे केवळ कागद नाही, समाजाच्या आरोग्याची हमी — आ. सुधीर मुनगंटीवार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरचा दीक्षांत समारंभ आज सैनिकी विद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. एमबीबीएस पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी विधिवत पदवीदान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील अभिमान या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
या प्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रेरणादायी आणि अनुभवसंपन्न असे भाषण करत विद्यार्थ्यांना समाजसेवेची दिशा दिली. आपल्या भाषणात मुनगंटीवार म्हणाले की, आजचा दिवस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे ही एक वेगळीच अनुभूती आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनुभव सांगताना नमूद केले की, “माझी मुलगी एमबीबीएस झाल्यावर मी पदवीदान समारंभाला गेलो होतो, त्या क्षणी जो आनंद झाला तो अवर्णनीय होता.तोच आनंद आज मी उपस्थित पालकांच्या चेहऱ्यावर अनुभवत आहे.
ते पुढे म्हणाले की, आज तुम्हाला मिळालेली पदवी ही केवळ कागदाचा तुकडा नाही, तर समाजातील आरोग्याची मोठी जबाबदारी आहे.आपल्या कुटुंबातील वैद्यकीय परंपरेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या परिवारात १३ डॉक्टर असून वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी १९६० साली एमबीबीएस पूर्ण केले. भाऊ नेत्ररोगतज्ञ, मुलगी व जावई रेडिओलॉजिस्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वतः डॉक्टर होऊ न शकल्याची खंत व्यक्त करत त्यांनी सांगितले की, आणीबाणीच्या काळात वडील तुरुंगात असल्याने ते वैद्यकीय शिक्षण घेऊ शकले नाहीत. मात्र गोंडवाना विद्यापीठ यांनी मानद डॉक्टरेट देऊन त्यांना ‘डॉक्टर’ ही उपाधी दिल्याचा त्यांनी उल्लेख केला.
कुटुंबातील डॉक्टरांना गमतीने मी नेहमी म्हणतो, तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये जितके पेशंट तपासत नसाल, तितके मी आरोग्य शिबिरांमध्ये पाहतो. चंद्रपूरमध्ये मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आपण योगदान दिल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी सांगितले की, या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात नवी पिढी घडविण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉक्टरांविषयी समाजातील श्रद्धा अधोरेखित करत ते म्हणाले की, डॉक्टर म्हणजे देवदूतच असतो.आज जरी स्पेशालिस्ट पद्धत रूढ असली तरी पूर्वी एकच डॉक्टर सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असत, त्यांचे वडील रात्री अपरात्री रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करत असत, अशी आठवण त्यांनी सांगितली.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांना सजग करताना सांगितले की, आज विज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या युगात स्वतःला सतत अपडेट ठेवणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही, पण तंत्रज्ञानाचा वापर करणारा डॉक्टर समाजाच्या निदान प्रक्रियेत मोठी प्रगती घडवू शकतो. टेलीमेडिसिन, रोबोटिक सर्जरी यांसारख्या नव्या संकल्पनांचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, नव्या आव्हानांचा स्वीकार करून संवेदनशील व कुशल डॉक्टर म्हणून स्वतःला सिद्ध करावे.
यावेळी त्यांनी काव्यात्मक शैलीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देत म्हटले,
“नई डगर है, नया सफर है,
विज्ञान के साथ चलना होगा,
मशीनें तो बस जरिया है,
पेशंट की धड़कनों को सुनना होगा.”
या ओळींमधून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मानवी संवेदनांचा महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना “देवदूत” बनून समाजसेवेचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
याशिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सैनिकी विद्यालयाच्या सभागृहासमोरील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या ६२ अभ्यासक्रमांच्या केंद्राचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“चंद्रपूरचा ‘सी’ कायम ‘चॅम्पियनशिप’चाच असावा,” असे म्हणत जिल्ह्याच्या प्रगतीबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.
या कार्यक्रमाला पद्मश्री माजी खासदार डॉ. विकास महात्मे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. मंगेश गुलवाडे, उपअधिष्ठाता डॉ. शरद कुचेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
एकूणच, हा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण ठरला असून, समाजसेवेच्या दिशेने प्रेरणा देणारा सोहळा ठरला.



