अती उष्णतेमुळे शाळांना सुटी – वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

वर्धा, दि. 15 एप्रिल 2026 — जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महत्त्वाचा निर्णय घेत सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 15 एप्रिल 2026 रोजी वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता असून तापमान 43 ते 45 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत अधिकारांचा वापर करून दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी (गुरुवार) वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाने पालक व नागरिकांना आवाहन केले आहे की, उष्णतेच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी तसेच लहान मुलांना शक्यतो बाहेर जाणे टाळावे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे दिसून येत आहे.



