देशातील बहुजनांचे संविधान हेच रक्षाकवच – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार
कोथुळणा ता. नागभीड येथे जल्लोष भीमजयंतीचा कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
देशातील सर्वसामान्य माणसाला न्याय, समानता आणि स्वातंत्र्य मिळावे या करिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी दिलेल्या अमूल्य अशा संविधानामुळेच समाजातील गरीब श्रीमंत दरी मिटून प्रत्येकाला समानतेने जीवन जगण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे संविधानाची जपणूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून भारतीय संविधान हेच देशातील बहुजन समाजाचे खरे रक्षाकवच आहे. असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार विजयवाडा यांनी केले ते नागभीड तालुक्यातील कोथुळना येथे आयोजित जल्लोष भीम जयंतीचा या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कांकड्यालवार, गौतम शामकुळे नगरसेवक अमृत शेंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पुरुषोत्तम वाघमारे , माजी सभापती पुनम वाघमारे, नगरपरिषद बांधकाम सभापती जयप्रकाश गजपुरे, किरण पाथोडे सुरेश शेंडे पोलीस पाटील बारसागडे यांचे सह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज काही शक्ती संविधान कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, बहुजन समाजाने एकजूट दाखवत संविधानाचे रक्षण करणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर चालत समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे. आपल्या बहुजन समाजाला अजूनही अंधश्रद्धेने ग्रासले असून विविध प्रकरणातून भोंदूगिरी चा उलगडा होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा बोल मंत्र जीवनात आचरणात आणून स्वतःला व समाजाला शिक्षित बनवून समाज उन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आयोजित कार्यक्रमातील भीमगीताना, उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



