ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीचे ग्रामीण रुग्णालय “सलाईन”वर..! – श्रेयवादाच्या लढाईत इमारतीचे बांधकाम कागदावरच

बांधकाम तातडीने सुरू करण्याची तालुकावासीयांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील संपूर्ण गावांतील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय हेच प्रमुख आरोग्य केंद्र आहे. मात्र नव्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू न झाल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सध्या तात्पुरत्या २० खाटांच्या व्यवस्थेत उपचार सुरू असून ओपीडी, रक्त तपासणी व इतर विभाग वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अक्षरशः धावपळ होत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर बनत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर करून आणल्याचे श्रेय घेण्यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये स्पर्धा रंगली. विविध माध्यमांतून दावे-प्रतिदावे करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात इमारतीच्या बांधकामाला अजूनही सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यातच डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत होत असून अनेक कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

आरोग्य सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना संबंधित प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा तालुक्यातील नागरिकांनी दिला असून, “आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम हवे,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये