ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जगाला फक्त तथागतांचे विचारच वाचवू शकतात. – विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार

रूई येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व भीम जयंती सोहळा

चांदा ब्लास्ट

तथागत गौतम बुद्ध यांचे विचार सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समजले. त्यांनी बुद्धांच्या समतेच्या, मानवतेच्या आणि बंधुत्वाच्या शिकवणीचा सखोल अभ्यास करून तो विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य केले.आजच्या काळात जगभर अस्थिरता, संघर्ष, जातीय तेढ आणि विषमता वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मानवतेचा मार्ग दाखवणारे तथागत बुद्धांचे विचारच जगाला वाचवू शकतात, असे बहुमोल विचार विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते,आमदार वडेट्टीवार यांनी मांडले.

ब्रम्हपुरी तालुक्यातील रूई येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ देवेश कांबळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, भंतेजी राहुल बोधी, भंतेजी आनंद, भंतेजी सारी पुत्र, भंतेजी मोगलाराम, उत्तम बनकर, अण्णा ठाकरे, देवचंद ठाकरे, जयकुमार मेश्राम, अनिल थूल, अॅड दिनेश लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे, अशोक मेश्राम यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 पुढे बोलतांना विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, शूद्र आणि वंचित समाजाला मिळणारी अन्यायकारक वागणूक पाहून बाबासाहेब अत्यंत अस्वस्थ झाले होते. समाजातील विषमता, अन्याय आणि भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य संघर्षात घालविले. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला. शांतता, करुणा, प्रेम, समता आणि बंधुभाव या मूल्यांची आज जगाला सर्वाधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर आपल्या समाजाचे काय झाले असते, याची कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो. त्यांनी वंचित, शोषित, पीडित आणि दुर्लक्षित समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामुळेच आज समाजातील अनेक घटक सन्मानाने जगत आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम बनकर यांनी तर सूत्रसंचालन प्यारेलाल बनकर यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान बुद्ध मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी जयभीम, नमो बुद्धायच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. कार्यक्रमाला विविध गावांतील समता सैनिक दलाच्या महीला, पुरूष व गावकरी मंडळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये