ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या यशातून समाजाचा आणि देशाचा विकास घडणार – आ. किशोर जोरगेवार

श्री चोखामेळा विद्यार्थी बोर्डिंग येथील अभ्यासिकेचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट

पंचशील चौक, जटपुरा वार्ड, चोर खिडकी या परिसरात शिक्षणाची ज्योत अधिक तेजस्वी करण्यासाठी आपण ४० लाख रुपयांत साकारलेली ही अभ्यासिका म्हणजे केवळ एक इमारत नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे. तिचा योग्य वापर करा, मन लावून अभ्यास करा आणि आपल्या आयुष्यात मोठे ध्येय साध्य करा. तुमच्या यशातच आपल्या समाजाचा आणि देशाचा विकास दडलेला असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले

आमदार किशोर जोरगेवार यांनी ४० लाख रुपयांचा निधी देत श्री चोखामेळा विद्यार्थी बोर्डिंग येथे साकारलेल्या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना शिरसागर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे, श्री चोखामेळा विद्यार्थी बोर्डिंगचे कार्याध्यक्ष एन. डी. पिंपळे, अध्यक्ष महाबोधी पुनवटकर, सचिव मोरेश्वर चंदनखेडे, अधीक्षक आर. बी. पेटकर, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, महामंत्री रविंद्र गुरुनुले, नगरसेविका श्वेता तोतडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी योग्य वातावरण, शांतता किंवा आवश्यक सुविधा उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी ही सुसज्ज अभ्यासिका त्यांच्यासाठी एक आदर्श व प्रेरणादायी केंद्र ठरणार आहे. येथे विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि एकाग्रतेने अभ्यास करता येईल, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळेल.

हा उपक्रम म्हणजे समाजातील विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून त्यावर उपाय शोधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शिक्षण हीच खरी शक्ती आहे आणि या शक्तीच्या माध्यमातूनच आपला समाज, आपला जिल्हा आणि आपला देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकतो. चंद्रपूर मतदारसंघात आपण अभ्यासिकांचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. आज जवळपास १७ अभ्यासिकांचे काम सुरू आहे, तर काही अभ्यासिका लोकार्पित करण्यात आल्या आहेत.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेल्या पवित्र दीक्षाभूमी येथे आपण एक कोटी रुपयांची अभ्यासिका उभारली आहे. ती उत्तमरीत्या संचालित होत असून, नुकत्याच लागलेल्या पोलीस भरतीच्या निकालात येथे अभ्यास करणारे ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या श्री चोखामेळा अभ्यासिकेतूनही अनेक शासकीय अधिकारी घडावेत. तसेच बाबूपेठ येथे जवळपास ४ कोटी रुपयांतून अभ्यासिका तयार केली असून, ती देखील लवकरच लोकार्पित करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये