शेतातील घरात १२ वर्षीय मुलीचा मृतदेह; दगडाने ठेचून खून, अत्याचाराचाही संशय
घटनास्थळी पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका रोठा गावाजवळील शेतातील घरात बुधवारी (दि. १५ ला १२ वर्षीय मुलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसर हादरला. डोक्यावर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, मृतदेहाची अवस्था पाहता लैंगिक अत्याचाराच्या संशयानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी महाडीक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सावंगीचे पोलिस निरीक्षक विनोद गिरी तसेच रामनगरच्या पोलिस निरीक्षक पौर्णिमा राखुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत असून, रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्याचे
कामही सुरू होते. मृत मुलीचे कुटुंब शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहे.
तपास अनेक अंगांनी सुरू
विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने लैंगिक अत्याचाराच्या संशयानेही तपास. एफएसएल पथकाकडून घटनास्थळावरील वैज्ञानिक व तांत्रिक पुरावे संकलित. कुटुंबीयांसह संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू. उत्तरीय तपासणी व वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि इतर बाबी स्पष्ट होणार. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके कार्यरत.
अल्पवयीन मुलीच्या निघृण हत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात संतापाचे वातावरण पसरले आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



