ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जन्मदाता बापचं झाला क्रूरकर्मा,अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शिक्षकांच्या सतर्कतेमुळे आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली असून, एका ३७ वर्षीय व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीत शिक्षण घेत असून कुटुंबातील वडिलांना दारूचे व्यसन असल्याने घरात वारंवार वाद होत होते. परिस्थितीला कंटाळून मुलीची आई सुमारे तीन महिन्यांपूर्वी मुलगा व मुलगी यांना घेऊन राजुरा येथे माहेरी गेली होती. मात्र, मुलीच्या परीक्षेमुळे वडिलांनी तिला पुन्हा वेडगाव येथे आणले. दरम्यान, आरोपीने मुलीवर पुन्हा अत्याचार केल्याचे समोर आले. दुसऱ्या दिवशी शाळेत परीक्षा देण्यासाठी आलेल्या मुलीच्या बॅगेत कपडे आढळल्याने शिक्षकांना संशय आला. चौकशीदरम्यान मुलगी भावनिक होऊन रडू लागली व तिने घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला.

शिक्षकांनी तात्काळ जबाबदारी पार पाडत गावातील पोलिस पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर लाठी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी शाळेत पोहोचून मुलीची सविस्तर चौकशी केली आणि तिच्या जबाबानुसार तातडीने कारवाई केली. मुलीची वैद्यकीय तपासणी चंद्रपूर येथे करण्यात आली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

*शिक्षकांची सतर्कता*

या गंभीर प्रकरणाचा भांडाफोड करण्यात शाळेतील शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असून त्यांच्या सतर्कतेमुळेच हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गोंडपिपरी तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये