“चोर बी. टी.” नावाने प्रसिद्ध तेलंगणा, आंध्रातील नकली कापूस बियाणे गोंडपिपरी तालुक्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यात पेरणी हंगाम सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांतून कापूस बियाणे दाखल होत आहेत. शेतकऱ्यांना बियाणे खरेदीकरिता आणण्यासाठी खासगी वाहनचालकांना आर्थिक प्रलोभन दिले जात आहे. शेतकऱ्यांनाही जास्त बियाण्यांवर सूट दिली जात असल्याची माहिती आहे. खरीप हंगाम सुरू होण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. शेतकऱ्यांनी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी अप्रमाणित बियाणे विकणारे सक्रिय झाले आहेत. सध्या तरी तालुक्यात केवळ बियाण्यांचा साठा केला जात आहे. पावसापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अप्रमाणित बियाणे विकण्याचा परराज्यांतील विक्रेत्यांसोबतच स्थानिकांची डाव आहे. कृषी केंद्रातील निर्धारित दरापेक्षा कमी किमतीत बियाणे मिळत असल्याने शेतकरी अशा आमिषांना बळी पडण्याची शक्यता आहे.
सध्या प्रचलित असलेल्या बीजी_२ बियाण्यांच्या तुलनेत एचबीटी ( चोर बी टी ) लागवड अधिक सोयीची ठरत असल्याने शेतकऱ्यांचा दावा आहे. विशेषतः या बियाण्यांवर थेट तणनाशक फवारणी करता येत असल्याने निंदन खर्चात मोठी बचत होते. तसेच बोंडअळी व इतर रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असल्याचेही शेतकरी सांगतात. उत्पादन खर्च कमी आणि तुलनेने उत्पन्न अधिक मिळत असल्याने शेतकरी चोर बियाण्यांकडे वळत आहेत. मात्र यामध्ये तस्करांचा मोठा फायदा होत असल्याने चढ्या भावात बियाणे विक्री होत असल्याचेही दिसून येत आहे.
*गावागावात विक्रेते सक्रिय*
अवैध दारू, रेती यापेक्षाही चोर बी. टी. बियाणे विक्रीवर अधिकाधिक, डबल फायदा होत असल्याने तालुक्यातील गावागावात अवैध्य बियाणे विक्रेते सक्रिय झाले आहेत. कमी कालावधीत लाखो रुपयांची कमाई होत असल्याने गावखेड्यातील काही “वजनदार” व्यक्ती या कामात सक्रिय असल्याचे कळते. सोबतच राजकीय पाठबळ असलेल्या काही कार्यकर्त्यांसह कृषी केंद्रात काम करणाऱ्या काही व्यक्तींचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
*शेतकऱ्यांची धावाधाव*
कृषी केंद्रातील नामांकित कंपनीपेक्षा चोर बी टी बियाणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याने, या बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची या विक्रेत्यांकडे धावाधाव होत आहे. मात्र याच संधीचा फायदा घेत दलालांकडून जास्त दराने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्या जात आहे.
*भरारी पथकाची वाट..!*
चोर बियाण्यांवर कडक निर्बंध आणण्याकरिता आणि याची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांच्या वतीने भरारी पथक तयार करून तपासणी केल्या जाते. मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोर बी टी विक्री होत असूनही अजूनपर्यंत भरारी पथकाचा पत्ता नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भरारी पथकाची वाट पाहण्यात आणि सर्व बियाणे विकून झाल्यावर भरारी पथकाचे “वरातीमागून घोडे” येतील का..?, हा प्रश्न सामान्य बळीराजाला पडला आहे.



