“लेक वाचवा_लेक शिकवा” अभियानांतर्गत लक्कडकोट परिसरातील विद्यार्थिनींना सायकलचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
शालेय विद्यार्थिनींना शाळेत जाण्याकरिता त्रास होऊ नये, त्यांना लवकरात लवकर शाळेत पोहचता यावे आणि वेळेची बचत होऊन अभ्यासाकरिता जास्तीत जास्त वेळ मिळावा, हा उदात्त हेतू समोर ठेऊन स्थानिक सम्राट अशोक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या परिसरातील लक्कडकोट, कोष्टाला, आनंदगुडा येथील ३१ विद्यार्थिनींना “लेक वाचवा_लेक शिकवा” अभियानांतर्गत जी. आर. इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड यांच्यावतीने आज (८ एप्रिल) लेडीज सायकलचे वितरण करण्यात आले
सम्राट अशोक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजित जिचकार तर प्रमुख अतिथी म्हणून सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर गिरिजेश त्रिपाठी, प्रोजेक्ट मॅनेजर गिरीशचंद खंडेलवाल, श्रीनिवास, लक्कडकोटच्या सरपंच सजणाबाई आत्राम, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोज मुन, मुख्याध्यापक शैलेश दुबे यांची उपस्थिती होती.
“लेक वाचवा_लेक शिकवा” राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी विद्यार्थिनींना देण्यात आली. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छाही देण्यात आल्या. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



