भद्रावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच गौतम बुद्ध जयंती निमित्त शिलभद्र मंडळ गौतम नगर भद्रावती तर्फे अशोक बुद्धविहार, गौतम नगर येथे १४ एप्रिल २०२६ ते १ मे २०२६ या कालावधीत विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांद्वारे समाजात बौद्ध धम्माचे विचार, शिक्षणाचे महत्त्व व सामाजिक समतेचा संदेश देण्याचा उद्देश आहे.
मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पंचशील ध्वजारोहन व सामूहिक बुद्ध वंदना करण्यात येणार असून सकाळी १०.४५ वाजता सावित्रीमाई, जिजाऊ व रमाई यांच्या जीवनावर आधारित नृत्य सादरीकरण होणार आहे. सकाळी ११.०० वाजता उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत इयत्ता ५ वी ते ७ वी विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य असा आहे.
शुक्रवार दि. १ मे २०२६ रोजी तथागत बुद्ध जयंती निमित्त सकाळी १०.३० वाजता पंचशील ध्वजारोहन व सामूहिक बुद्ध वंदना करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती या विषयावर धम्मचारिणी अमोघश्री, ऊर्जाग्राम (चंद्रपूर) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी इयत्ता ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आजची गरज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक जीवन संघर्ष हे विषय देण्यात आले आहेत.
या जयंती उत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सर्व धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



