ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समीक्षा : विदारक वास्तविकतेची अस्वस्थता : ‘पुढे कसे होईल?’ _ प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

शेती-मातीशी घट्ट नाळ जोडत सहकार क्षेत्रातील बँकेत नोकरी करणारा प्रामाणिक निस्पृह असा उत्तम संवादसेतू, एक संवेदनशील कवी, कलावंत म्हणजे शंकरजी लोडे होय. ग्रामीण क्षेत्राशी निगडित श्रममूल्य जाणणारा शेतकरी, सहकार क्षेत्राशी संबंधित नोकरदार, नाट्य क्षेत्रात भूमिका साकारणारा कलावंत, समाजभान असणारा संवेदनशील कवी अशा विविध पातळ्यांवरील शंकर लोडे यांचे जगणे अर्थपूर्ण झाले आहे. साहित्य-नाट्य-कला प्रांतात वावरणाऱ्या या कवीचा विदारक वास्तविकतेची अस्वस्थता प्रत्ययकारीपणे मांडणारा ‘पुढे कसे होईल?’ हा काव्यसंग्रह स्तंभ पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित झाला आहे.

कवीने नाट्यअभिनेता म्हणूनही छाप सोडली आहे. ‘पाटलाच्या पोरी जरा जपून, येळकोट मल्हार, घर देता का घर, अंदाधुंद, एक रात्र पावसाळी, तांडा या हौशी व व्यावसायिक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. तद्वतच ‘हद्द दोन’ या चित्रपटातही अभिनय केला आहे. जीवनाशी प्रामाणिक राहून समाजातील वास्तवाकडे डोळसपणे पाहणाऱ्या या कवीला जे वास्तव दिसले, जाणवले, अनुभवले त्यांचे प्रत्यंतर ‘पुढे कसे होईल ?’ या काव्यसंग्रहातील ६७ कवितातून उमटले आहे.

महापुरुषांच्या विचारांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात जे विपरीत घडते आहे, ते पाहून कवी व्यथित होतो. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी शिकवण दिली; त्या विसंगत वृत्ती इथल्या नराधमांकडून होते आहे. अस्वच्छता, अंधश्रद्धा व्यभिचार, अन्याय-अत्याचार, स्वैराचार हे पाहून कवी उद्विग्नपणे प्रश्न उपस्थित करतो;

‘असे किती द्यावे दाखले

संतांचे आणि राष्ट्रपुरुषांचे

चालली संस्कृती रसातळाला

आमचे डोके ठिकाणावर कधी यायचे ?’

विकृतांचा वाढता उत्थानपणा, अरेरावी, अमानवीयता आणि त्यांचे समर्थन करणारे पाठीशी घालणारे नेते यामुळे अनागोंदी माजत आहे. समाजातील दारिद्र्य, अनैतिकता, विकृती याला जबाबदार केवळ शासनालाच धरणे कितपत योग्य आहे ? असेही कवीला वाटते. दुष्कृत्यास आळा घालण्यासाठी अन्यायाविरुद्ध सर्वसामान्य नागरिकांनी बंड करायला हवे.

‘तुम्ही आम्ही सारे आता एक झालं पाहिजे

आपला भाऊ असो वा काका

गुन्हा करणाऱ्यांना ठेचूनच काढलं पाहिजे’

अशा स्पष्ट शब्दात गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी केवळ शासनालाच जबाबदार न धरता लोकजागृतीनेच लोकांनी पुढाकार घेत अद्दल घडवली पाहिजे, असा आशय कवी व्यक्त करतात. भरदिवसा माणसांच्या होणाऱ्या हत्या, निष्पापांचे लचके तोडणे, बलात्कार, वाढती गुन्हेगारीप्रवृत्ती, पैसेवाल्यांच्या साम्राज्यापुढे नतमस्तक होणारे अधिकारी, बेईमानीची दुनिया वाढत चाललेली आहे. विश्वास, प्रेम, शांतीचा काही जमाना राहिला नाही, हे सांगताना ‘पुढे कसं होईल सांगता येत नाही, कठीण झालं जगणं जगताही येत नाही’ असे कवीला वाटते आहे. नैराश्याबरोबरच जगण्यातील हतबलता आणि व्यवस्थेतील विसंगतीचे दर्शनच या कवितासंग्रहातून कवीने घडविले आहे.

शेतकरी बापाने कष्टाने राबून मुलांना जिकिरीने उच्चशिक्षित करायचे आणि मुलांनी मात्र वडिलांच्या दुर्दशेकडेही आस्थेने पहायचे नाही. मुलांना लाखभर पगाराची नोकरी मिळाली आणि सुंदर स्त्री घरात आली की आई-वडिलांची अवहेलना करायची, या समाजवास्तवावर कवीने अचूक बोट ठेवले आहे. जन्मदात्या आई-वडिलांविषयी कृतघ्न ठरणाऱ्या विद्यमान पिढीच्या बदलत्या मानसिकतेचे आणि विकृत प्रवृत्तीचे दर्शन कवी शंकर लोडे कवितांतून घडवितात.

कवी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणूनही काम करतात. त्यामुळे काबाडकष्ट करून जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनाची बकाल अवस्था कवी अनेक कवितातून टिपतो. शेतकऱ्याविषयीचे प्रेम व आस्था काव्यातून प्रकर्षाने प्रत्ययास येते. प्रचंड परिश्रमाने घाम गाळणारा, शेतात राबणारा शेतकरी एकाचे दाणे हजार करणारा, मात्र तो दिलदार आहे. शेतातील कडधान्य पिके, शेंगा, हिरवा भाजीपाला थैलाभर सहज वावरात, घरादारात येणाऱ्यांना देऊन टाकतो, अशा दातृत्वशील शेतकऱ्यांना जेव्हा अधिकारी-नोकरदार छळतात, वाममार्गाने त्यांच्याकडून पैसा उकळतात, त्यावेळेस मात्र कवीचा संताप अनावर होतो. कवी उपरोधिकपणे लिहीतो,

‘भल्या मोठ्या पगाराची करतो तू नोकरी,

 लाज मागतो बळीराजाला किती रे तू भिकारी’

अन्नदात्याकडे लाच मागणाऱ्या भिकाऱ्यांचा खरपूस समाचार कवी घेतो. जगाच्या पोशिंद्याची होणारी अवकळा कवीला अस्वस्थ करते. निसर्गाची अवकृपा, दुष्काळ, विविध रोगराई, त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान यात शेतकरी होरपळला जातो. प्रचंड परिश्रम करुनही खर्च वजा जाता त्याच्या हातात जेव्हा शून्य शिल्लक राहते, त्यावेळेस मात्र कवी उद्विग्नपणे म्हणतो,

“खरी किंमत कधी शेतकऱ्यांची कळेल का

या जन्मी तरी त्याला हमीभाव मिळेल का?”

विकासाच्या नावाखाली विविध योजना आखल्या जातात. परंतु, शेतकऱ्यांसाठी मात्र त्याला हमीभाव देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्याची कोणतीही योजना सरकार आखत नसल्याचे शल्य कवीला बोचते. विद्यमान पिढीचे देशप्रेम कसे बेगडी होत चालले आहे हे कवी देशभक्ती सारख्या कवितेतून सुचवितो.

“देश प्रेमापोटी हुतात्म्यांना आले वीरमरण

तिरंग्याच्या नावावर तुझं केवळ राजकारण

आता गल्ली-गल्लीत तुझे बॅनर फार झाले

तिरंग्याच्या बाजूला फोटो चमकून राहिले

भाऊ पहिल्यासारखे तुझं देश प्रेम आहे का?”

स्वार्थांने बरबटलेल्या राजकीय नेत्यांच्या दुटप्पीपणाचे, केवळ सत्ता हडपण्याच्या अट्टाहासाचे, विदारक चित्र कवी रेखाटतात.

“नांदताना लोकशाही कुठेही दिसत नाही

सत्तापिपासू लोकांना सत्तेची झाली घाई

असे हे वर्तमान आता काही बरे नाही

एक दिवस धोक्यात येईल लोकशाही”

अशा ओळीतून सावधानतेचा इशाराही कवी देतो.

वास्तविक स्थिती पाहून कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न वाचकाला जशी अंतर्मुख करणारी आहेत; तशीच उत्तराच्या दिशेने प्रवृत्त करणारीही आहेत. आमचे डोके ठिकाणावर कधी यायचे, ठेचून काढलं पाहिजे, पुढे कसे होईल?, माणूस माणसासारखा का वागत नाही? या कविता समाजचिंतन व्यक्त करणाऱ्या आहेत. आणखी काही नको, स्त्री रूपे, उकिरडा, मुलगी, माय, बाबा तू का बरे खचला, यासारख्या व स्त्रीसक्षमीकरण व स्त्रियांच्या विविध दुखांचे वर्णन करणाऱ्या कविता आहेत. स्वैराचारी वृत्तीमुळे वाढता व्यभिचार आणि लैंगिकतेचे चित्र रेखाटताना व्यभिचारी आईला मुलीने विचारलेला प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. कवी लिहीतो;

‘आई मी उकिरड्यावर सांग कसं जगायचं

एकदा सांग मला बाबा कुणाला म्हणायचं

मी आता ताट मानेने जगू शकत नाही

सांग तुझी अब्रू तू का विकली आई?

विदारक वास्तविकतेचे दर्शन घडवित अंतर्मुख करणारा हा प्रश्न स्त्रियांविषयी सहानुभूतीचा दृष्टिकोन, मुलीला-पत्नीला जीवनात अधिक महत्त्व देणाऱ्या कवीच्या वर्तनातून तसेच लेखनातूनही जाणवतो. दिव्यातील वाती प्रमाणे स्वतः जळत घर प्रकाशमय करणाऱ्या स्त्रियांविषयीचा सन्मान शंकर लोडे यांच्या अनेक कवितातून अभिव्यक्त होतो. खचलेल्या बाबाला आधार देणारी मुलगीच असते, मुलीचं हे स्वगत फार आशादायीपणे कवितेतून मांडले आहे.

“बाबा तू डोळ्यात नको आणू आसू

चंद्र सूर्य तारे आम्हा जवळ लागले दिसू

आम्ही मुलीही आता नाही कशात कमी

तुला पोसायची मी घेते ना रे हमी

असा दिलासा देत वडिलांच्या पाठीशी राहणाऱ्या स्नेहसंमत्वभाव आणि जबाबदारी पेलणाऱ्या मुली मुलांपेक्षा खंबीर आहेत. स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन करणारी ‘कुंकवाची टीळ’ कविताही महत्वपूर्ण आहे. एकंदरीत विविध जाणीवांसह अवतीर्ण होणाऱ्या कविता वाचकाला अंतर्मुख करून जबाबदारीची जाणीव करून देत विचारप्रवृत्त करणाऱ्या आहेत. व्यसनाधीनतेने बरबटलेला, दारिद्र्याने पीडलेला, बेरोजगारीने गांजलेला तरुण आणि विदारक वास्तव हे कवी शंकर लोडे यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी येते. महापुरुषांच्या विचाराची पेरणी, वास्तविकतेचे भेदक दर्शन, समाजमनस्क चिंतनशीलता, अन्याय, अत्याचार, अनैतिकता, अबलांची व्यथा, लाचखोरपणा, केवळ आश्वासन देणारे सत्तापिपासू मवाली, निर्लज्ज नेते, ग्रामजीवनातील हिस्से वाटणी, भांडण-तंटे, स्वार्थीपणा, नात्यातील शिकवण, जबाबदारीची जाणीव इत्यादी विशेष या काव्यसंग्रहातून प्रकर्षाने जाणवतात. प्रश्नात्मकता हे या काव्यसंग्रहाच्या केंद्रस्थानी आहे.

कवी समाजाला, व्यवस्थेला थेट प्रश्न उपस्थित करून वास्तविकतेचे दर्शन प्रत्ययकारीपणे घडवतो. सुचविण्यापेक्षा सांगण्यावर अधिक भर देत लोकप्रबोधनाच्या हेतूने प्रासादिकपणे लेखन केलेल्या या संग्रहात संवादात्मकता हा विशेष गुण प्रकर्षाने जाणवतो. संवाद हा कधी व्यक्तीशी तर कधी समष्टीशी, कधी परिस्थितीशी तर कधी इथल्या व्यवस्थेशी होतो. सांग, अरे, किती रे, माय, बाबा, चल सत्याने वागू, उठ, वाग जरा प्रेमाने अशा संवादातून काव्याचे प्रत्ययकारी रुप कवीने व्यक्त केले आहे.

हलाखीच्या परिस्थितीतही मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या आणि कष्टाची सदैव जाणीव करून देणाऱ्या बापाला अर्थात खुशालराव लोडे यांना कवीने हा कवितासंग्रह अर्पण केला आहे. यातून वडिलांप्रतीची कृतज्ञताच व्यक्त होते. सुबक, आकर्षक, आशयसूचक संतोष धोंगडे यांनी काढलेले मुखपृष्ठ, कवितांना रेखीव करणारी प्रमोदकुमार अणेराव यांची रेखाटने, सुरज दहागावकर यांची कौशल्यपूर्ण मांडणी, डॉ.किशोर कवठे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि अविनाश पोईनकर यांच्या स्तंभ पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला ‘पुढे कसे होईल ?’ हा देखणा काव्यसंग्रह वाचनीय व मराठी काव्यास समृद्ध करणारा अर्थातच स्वागतार्ह आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये