औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कारभार रामभरोसे!
आमदार देवराव भोंगळे यांचा संताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना :_ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सध्या पूर्णपणे रामभरोसे चालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव दादा भोंगळे यांनी 2 एप्रिल ला संस्थेला दिलेल्या अचानक भेटीत हा प्रकार उघडकीस आला.
या संस्थेमध्ये एकूण 11शासकीय कर्मचारी व 5 तासिका कर्मचारी असे एकूण 16 कर्मचारी कार्यरत आहेत. येथे ड्रेस मेकिंग, वेल्डर, फिटर, वायरमन आणि मेकॅनिकल अशा पाच ट्रेडमध्ये शिक्षण दिले जाते. सध्या सुमारे १०३ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मात्र आमदारांच्या भेटीदरम्यान प्राचार्यांसह अनेक कर्मचारी गैरहजर होते, तर एकही विद्यार्थी संस्थेमध्ये उपस्थित नव्हता. त्यामुळे आमदार भोंगळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
संस्थेत विजिट रजिस्टर व हालचाल (मुव्हमेंट) रजिस्टरही उपलब्ध नसल्याचे आढळून आले. संपूर्ण परिसरात सन्नाटा पसरलेला होता. केवळ चार कर्मचारी उपस्थित होते, तर उर्वरित कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. यावरून संस्थेचा कारभार पूर्णतः ढिसाळपणे आणि निष्काळजीपणे चालत असल्याचे स्पष्ट झाले.
या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार भोंगळे यांनी प्रभारी संचालक मुंबई येथील सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. गैरहजर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
कोरपना तालुक्यातील ही एकमेव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असल्याने येथील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. “अशी विदारक परिस्थिती असेल तर या तालुक्यातील विद्यार्थी घडणार कसे?” असा सवाल पालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व संस्थेतील शैक्षणिक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.



