ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार देवराव भोंगळे यांनी शब्द पाळला; गडचांदूर येथे १० कोटींचे भव्य बसस्थानक मंजूर!

७९ वर्षांची प्रतीक्षा संपली; औद्योगिक नगरीला मिळणार अत्याधुनिक बसस्थानक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

औद्योगिक नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या गडचांदूर शहराच्या विकासातील एक अत्यंत सुवर्णक्षण आज उजाडला असून, आमदार देवराव भोंगळे यांच्या अथक पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिलेला शब्द आमदारांनी केवळ एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करून दाखवला आहे. महाराष्ट्र शासनाने गडचांदूर येथे अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा नवीन बसस्थानकाच्या उभारणीसाठी १० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला असून, यामुळे शहराच्या विकासाचा एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होऊनही गडचांदूरसारख्या महत्त्वाच्या शहरात हक्काचे एसटी बसस्थानक नव्हते, ही मोठी शोकांतिका होती. आजवर अनेक लोकप्रतिनिधींनी या क्षेत्राचे नेतृत्व केले, मात्र या ज्वलंत प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. परिणामी, दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना, सिमेंट उद्योगातील कामगारांना, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना उन्हाळा-पावसाळ्यात उघड्यावर उभे राहून एसटीची वाट पाहावी लागत होती. विशेषतः लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या मातांची होणारी गैरसोय आणि पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेच्या सोयींचा असलेला अभाव यामुळे जनतेत मोठा असंतोष होता. जनसामान्यांची ही वर्षानुवर्षांची वेदना ओळखून आमदार देवराव भोंगळे यांनी निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून या प्रश्नाला निकाली काढण्याचा ध्यास घेतला होता. याठिकाणी बसस्थानक निर्मितीसाठी जागेचा प्रश्न होता; त्यामुळे त्यांनी यशस्वी पाठपुराव्याने तो प्रश्न निकाली काढून बसस्थानकासाठी हा निधी खेचून आणला.

आमदार देवराव भोंगळे यांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात या प्रश्नावर जोरदार आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले. विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करत आणि शासन दरबारी सातत्याने मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि परीवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक, राज्यमंत्री ना. माधुरीताई मिसाळ यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी या बसस्थानकाची कोंडी फोडली. याचीच फलश्रुती म्हणून राज्य शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भात विशेष शासन निर्णय निर्गमित करून या कामाला प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान केली आहे.

या निर्णयानुसार गडचांदूर येथे उभारले जाणारे बसस्थानक हे अत्यंत आधुनिक स्वरूपाचे असणार आहे. यामध्ये तळमजल्यावर प्रशासकीय कार्यालय, पहिल्या मजल्यावर कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह, भव्य वाहनतळ, पेव्हर ब्लॉक, आकर्षक कुंपणभिंत आणि गेट अशा सुविधा असतील. तसेच, पर्यावरणाचा विचार करून रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणा व सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, माता-भगिनींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित कक्षाची तरतूद या इमारतीत करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल माहिती देताना आमदार देवराव भोंगळे यांनी सांगितले की, गडचांदूर ही केवळ एक औद्योगिक नगरी नसून या भागातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. येथे सुसज्ज बसस्थानक असणे ही काळाची गरज होती. या १० कोटींच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या बसस्थानकामुळे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईलच, पण त्यासोबतच प्रवाशांना सन्मानाने प्रवास करता येईल. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या इमारतीचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचांदूरला अशा प्रकारचे अत्याधुनिक बसस्थानक मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार देवराव भोंगळे यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे. या बसस्थानकामुळे गडचांदूर शहराच्या सौंदर्यात आणि प्रगतीत निश्चितच मोठी भर पडणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये