कोरपना येथे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तहसील कार्यालय कोरपना यांच्या वतीने जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय परिसरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमात विविध शासकीय विभागांकडून ग्राहकांचे हक्क, कर्तव्ये तसेच ग्राहक संरक्षण कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित विभागांच्या माहितीपर स्टॉल्सही उभारण्यात येणार असून, त्याद्वारे नागरिकांना थेट माहिती व सल्ला मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरणार असून त्यांना प्रत्यक्ष तज्ज्ञांकडून माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तहसील प्रशासनाच्या या उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढून फसवणूक, गैरप्रकार यांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.



