भद्रावतीत येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
श्रीराम जन्मोत्सव समिती, भद्रावती यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त दिनांक २५ व २६ मार्च २०२६ दरम्यान विविध कार्यक्रम व प्रभू रामचंद्राच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २५ मार्च ला दुपारी ३.३० रामायणातील सुंदरकांड सादरकर्ते राजस्थानी महिला मंडळ, भद्रावती व त्यानंतर रात्री ठिक ८.०० वाजता सोनी टीव्ही झी टीव्ही फेम डॉ.प्रशांत महाराज ठाकरे अकोला यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होईल.
दिनांक २६ मार्च रोज गुरुवारला सकाळी १०.३० वाजता डॉ.प्रशांत महाराज ठाकरे अकोला यांचे कीर्तन व श्रीराम जन्म सोहळा पार पडणार आहे. दुपारी १.०० ते १.३० या वेळेत मागील वर्षाचा अहवाल वाचन व प्रसाद वितरण होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता प्रभु श्रीरामचंद्राच्या भव्य शोभा यात्रेची सुरुवात बळवंतदादा गुंडावार व मनोहरराव पारधे यांच्या शुभ हस्ते पूजनाने येईल. याप्रसंगी खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार करण देवतळे, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, तहसिलदार राजेश भांडारकर, ठाणेदार योगेश्वर पारधी, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, सामाजिक कार्यकर्ते रविंद्रजी शिंदे, डॉ. विवेक शिंदे, विलास गुंडावार, प्रकाश कोठारी, सुशील देवगडे, हाजी बबन सेठ यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शोभायात्रा विठ्ठल मंदिर, किल्लावार्ड , बालाजी सभागृह, भोजवार्ड, जंगलनाका, बाळासाहेब ठाकरे गेट, शिंदेपेट्रोल पंप, जुना बसस्टॉप, नागमंदिर, लोकमान्य विद्यालय आदी मार्गाने पुन्हा प्रारंभ स्थळी शोभायात्रा परत येणार आहे.
या शोभायात्रेमध्ये विविध देखावे, भजनी दिंडी, झेंडा पथक, बँड पथक यांचा समावेश असून हजारोच्या संख्येने श्रीराम भक्त सहभागी होणार आहेत. नागरिकांनी आपापला परिसर सजवून शोभायात्रेचे स्वागत करावे व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती व संयोजक चंद्रकांत गुंडावार भद्रावती यांनी केले आहे.


