झाडीपट्टीच्या “झाडीवुड” नाट्यकलेचा गवगवा देशभरात व्हावा : पद्मश्री डॉ. परशुराम खुणे
कलावंतांचा स्नेहमिलन तथा सत्कार सोहळा संपन्न ; संतनगरी धाबा येथे कलावंतांची मंदियाळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
पूर्व विदर्भातील झाडीपट्टीतील नाट्यकला ही मर्यादित न राहता, हॉलीवूड, बॉलीवूड नंतर आता झाडीवुड ची लोकप्रियता देशभरात गाजत असून, आपल्या मातीतील नाट्यकलेचा गवगवा देशभरात व्हावा, यासाठी झाडीपट्टीसाठी अहोरात्र काम करणाऱ्या कलाकारांची आता जबाबदारी वाढली असून झाडीवूडचे नाव देशात गौरविण्याकरिता प्रत्येकांनी तन मन धनाने एकत्र येऊन झाडीपट्टीतील नाट्यकलेला उंच शिखरावर पोहोचवावे, असे मत ज्येष्ठ नाट्यकलावंत, झाडीपट्टीतील दादा कोंडके पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी व्यक्त केले. धाबा येथे आयोजित झाडीपट्टीतील कलावंतांचे स्नेहमिलन तथा सत्कार सोहळा प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य मानव अत्याचार निर्मूलन समिती, युगचेतना ग्रामीण विकास संस्था आणि त्रिशा ई_स्कूल गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने संतनगरी धाबा येथे झाडीपट्टीतील नामवंत कलावंतांचे स्नेहमिलन तथा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी प्रा. राज मुसणे होते तर डॉ. परशुराम खुणे यांनी उद्घाटन केले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लोककलाकार हिरालाल पेंटर, ज्येष्ठ सामाजिक मार्गदर्शक रामदास पिपरे, नाट्य कलाकार भूमाला कुमरे, अरविंद झाडे, डॉ. प्रकाश तोहोगावकर, डॉ. मोहन डोंगरे, पत्रकार राजु झाडे, परिवर्तन संस्था अध्यक्ष राजेश डोंगरे, उपसरपंच हिरा कंदिकुरवार, कोंडय्या महाराज संस्थान कोषाध्यक्ष रामकृष्ण सांगडे, आरोग्यसेवक दीपक सोनारकर, शासकीय कंत्राटदार महेश सोनाकुलवार यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम थोर महापुरुषांच्या प्रतिमांना आदरांजली अर्पण करून अभिवादनाने उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तथागत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत सामूहिक नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकलीत. “दोनचं राजे इथे गाजले…” या गौरवगीतावर २० चिमुकल्यांच्या समूहनृत्याने उपस्थित प्रेक्षकांसह झाडीपट्टीतील कलाकारही भारावून गेले.
यानंतर झाडीपट्टी रंगभूमीत आपल्या कलेची अविरतपणे सेवा देणाऱ्या कलावंतांचा सत्कार करण्यात आला. झाडीपट्टीतील पुरुष कलाकार, स्त्री कलाकार, विनोदी कलाकार, अष्टपैलू कलाकार, गायक _ गायिका, वादक, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिका साकारणाऱ्या जवळपास शंभरेक कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते आकर्षक शिल्ड, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ज्यामध्ये युवराज प्रधान, किरपाल सयाम, दुधराम कावळे, संतोषकुमार, युवराज गोंगले, लाला पुंगाती, निकेश खोबरे, मंगेश जांभूळे, विलास पेंटर, लालु पेंडाम, संजू रामटेके, घनश्याम उपरीकर, लालचंद धाबेकर, रत्नदीप रंगारी, विवेक डांगट, प्रतिभा साखरे, सोनाली निस्ताने (डोंगरे), पौर्णिमा तायडे, शबाना खान, ममता गोंगले, वर्षा गुप्ते, दीपाली भराडे, स्वाती भसारकर, सारिका रामटेके, शार्दुल डोंगरे, लोकेश दुर्गे, मंगेश पेंदोर यांसह अनेक कलावंतांचा स्नेहमिलन सत्कार करण्यात आला.
झाडीपट्टीतील कलावंतांच्या सुरेल गीतांनी बहरलेल्या या कार्यक्रमात विनोदवीरांनी हास्याचे फवारे उडवून धमाल केली. कलाविष्कारात रंगलेल्या या सदाबहार कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अमित अलोने यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालनाने ॲड. सचिन फुलझेले यांनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजकांनी अथक परिश्रम घेतले.



