देऊळगावराजा शहरात बालाजी महाराज मंदिर परिसरात हिंदू संमेलन संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
एकत्र कुटुंब पद्धती कौटुंबिक संस्कार महत्त्वाचे आहेत कुटुंब व्यवस्था टिकली नाती टिकली तर देश टिकेल संस्कृती टिकेल.
मोबाईल हा आपल्या नियंत्रण असला पाहिजे आपण मोबाईलच्या नियंत्रणात राहू नये मुलांना पौष्टिक खाद्य द्यावे त्यांना केवळ फास्ट फूड देऊ नये.
प्रत्येकाने आपले भोजन भाषा,भूषा,भजन, भ्रमण, भवन हे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे असावे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी केले.
रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देऊळगाव राजा येथील बालाजी महाराज मंदिर परिसरात सकल हिंदू समाजाचे वतीने आयोजित हिंदू संमेलनात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प श्री.अनिरुद्ध महाराज क्षीरसागर व अश्विनीताई जाधव मेहेत्रे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना तामशेट्टीवर म्हणाले की संघटित हिंदू समाजासाठी संघाचे कार्य असून व्यक्ती निर्मानाच्या माध्यमातून ते साध्य होते. प्रत्येकाने कुटुंब प्रबोधनासह सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वबोध व नागरी कर्तव्यांचे पालन या पंचपरिवर्तनाचा स्वतः आचरण करून आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला यासाठी प्रेरित केल्यास 2047 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याचे शताब्दी पर्यंत शंभर कोटी लोक जरी देव, देश, धर्म संस्कृती रक्षणाचे पंच परिवर्तनाचे पालन करून आचरण करतील तर निश्चितच आपण विश्वगुरू बनू. या देशात राहणारा भारत माता की जय म्हणणारा या देशातील महापुरुषांना आपले महापुरुष मानणारा या देशाच्या वैभवासाठी खांद्याला खांद्या लावून पुढाकार घेणारा मग तो कुठल्याही जातीचा, पंथाचा, भाषा, प्रांताचा असो भारत माता की जय म्हणणारा तो हिंदू असे त्यांनी प्रतिपादन केले . देश विरोधी कृती करणारा हिंदू सुद्धा देशाचा शत्रूच आहे. झळ बसेपर्यंत वाट पाहू नका हिंदूंनो जागृत व्हा, संघटित व्हा असा संदेश त्यांनी या संमेलनाचे निमित्ताने दिला. माझ्या वस्तीत बांगलादेशचे घूसखोर येणार नाहीत त्याची काळजी घेतली पाहिजे, गोरक्षण झाले पाहिजे मंदिरांची देखभाल झाली पाहिजे, तिथल्या पूजा आर्चेची काळजी झाली पाहिजे, मंदिरे ही संस्काराचे केंद्र आहेत त्यांचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे यासाठी सर्व हिंदूंनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पर्यावरण संरक्षण गरजेचे असून पर्यावरण संरक्षण म्हणजेच राष्ट्ररक्षण झाडे लावा, पाणी वाचवा आपला परिसर स्वच्छ ठेवा, संविधानाचे पालन करा, स्वदेशी वस्तूंचा वापर करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. प्लास्टिकचा वापर टाळा हिंदू संमेलनात लावलेल्या पर्यावरण प्रदर्शनीचे सुद्धा त्यांनी याप्रसंगी कौतुक केले. प्रमुख अतिथी अनिरुद्ध महाराज यांनी उपस्थितांना हिंदू धर्म काय हिंदू संस्कृती रक्षण हिंदूंची कर्तव्य कोणती आहेत या संदर्भात समयोचित मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी अश्विनीताई जाधव मेहेत्रे यांनी नारी सुरक्षा या विषयावर उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. तरुण-तरुणी महिला पुरुष सर्वांनाच त्यांनी संस्कृती रक्षणाची जाणीव करून दिली. महिलांची वेशभूषा आचरण कसे असावे तसेच मोबाईलचा चांगला उपयोग नारी संरक्षणासाठी कसा करता येईल हे त्यांनी सांगितले उत्कृष्ट संबोधनाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
या संमेलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करण्याचे उद्देशाने प्रसादाचे वाटप करिता द्रोण व चमचा प्लास्टिक विरहित वापरण्यात आले आयोजकांनी प्लास्टिकला फाटा देऊन समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. पंचपरिवर्तन संकल्पनेतील पर्यावरण संरक्षण हे कृतीतून पाहायला मिळाले पर्यावरण विषय संदर्भातील प्रदर्शनी सुद्धा संमेलन स्थळी होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ गोमाता पूजनाणे झाला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारत माता पूजन झाले शिवरायांना मानवंदना देताना तुळजापूर येथील भजनी मंडळाने सादर केलेली विविध शिवगीते ही सुद्धा या संमेलनाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होती. जनाबाई भजनी मंडळाने सुद्धा सुंदर भजन प्रस्तुती केली. बाल शिवरायांचे वेशभूषातील बालक सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पूर्ण परिसर भगवामय झाला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद सावजी यांनी इतर आभार प्रदर्शन संतोष तिडके यांनी केले कार्यक्रमाचे जागृती करता सकाळी वस्तीमधून गजानन खांडेभराड यांनी वासुदेवाचे रूप घेऊन काढलेली प्रभात फेरी सर्वांना भारावून गेली व प्रत्यक्ष हिंदू संमेलनात तरुण आबालुद्ध हिंदू समाज बांधव माता-भगिनींची प्रचंड उपस्थिती होती.
वक्त्यांनी मांडलेले विषय सर्वांच्या हृदयाचा ठाव घेणारे असल्यामुळे सर्वांचा प्रतिसाद उत्तम होता. भारत मातेच्या सामुहिक आरतीने कार्यक्रमाची सांगता होऊन त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. सकल हिंदू समाज बालाजी वस्तीच्या आयोजन समितीने व हिंदू बंधू भगिनींनी स्वयंस्फूर्तीने परिश्रम घेऊन हे हिंदू संमेलन यशस्वी केले. यात बालाजी मंदिर परिसर व संत सावता माळी मंदिर परिसरातील तरुणांचा प्रामुख्याने सहभाग होता.



